…म्हणून गणेश नाईकांचा भाजप प्रवेश लांबणीवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभेच्या तोंडावर आज भाजपमध्ये अनेक आमदारांनी प्रवेश केला असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन आमदार असून एका काँग्रेस आमदाराचा समावेश आहे. या आमदारांमध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले, संदीप नाईक, मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड आणि काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांचा समावेश आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मात्र या सगळ्यात नवी मुंबईमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि भाजपमध्ये प्रवेश केलेले संदीप नाईक यांचे वडील गणेश नाईक यांनी मात्र भाजपमध्ये आज प्रवेश केलेला नाही. याआधी देखील ते प्रवेश करणार नसल्याची माहिती मिळत होती आणि त्या प्रमाणेच त्यांनी आज प्रवेश केलेला नाही. गणेश नाईक हे भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी फारसे उत्सुक नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र त्यांचे पुत्र संदीप नाईक आणि महापालिकेतील इतर नगरसेवक त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांनी अखेर प्रवेश न करण्याचे ठरवले. त्यामुळे गणेश नाईक यांच्या १० ते १५ समर्थक नगरसेवकांनी देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, गणेश नाईक यांनी भाजप प्रवेश केला नसला तरी संदीप नाईक आणि महापालिकेचे माजी महापौर सागर नाईक आणि राष्ट्रवादीच्या इतर आमदारांनी नियोजित कार्यक्रमाप्रमाणे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेत्यांचे उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

आरोग्यविषयक वृत्त