लुटमार करणारी महिलांची टोळी हिंजवडी पोलिसांकडून गजाआड, दोन लाखांचा ऐवज हस्तगत

ADV

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन –  राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमध्ये प्रवाशांसोबत वाद घालून गाेंधळ करून लुटमार करणाऱ्या महिलांच्या टोळीला गजाआड करण्यात हिंजवडी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी सात महिलांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख 83 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी महिला मुळच्या सोलापूर येथील असून, मुंबई – बेंगळुरू महामार्गावर लुटमार करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अर्चना मनोहर देवकर (वय 37 रा. घाटकोपर, वेस्ट मुंबई, मूळ रा. किरपे, ता. कराड, जि. सातारा) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

ADV

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अर्चना देवकर या कराड ते मुंबई असा प्रवास करीत होत्या. त्याच बसने सातही आरोपी महिला प्रवास करीत होत्या. दरम्यान सुतारवाडी ते राधा चाैक दरम्यान आरोपी सात महिलांनी फिर्यादी यांच्याशी वाद घालून त्यांना धक्काबुक्की केली. तसेच आरोपींनी फिर्यादी यांच्याकडील सोन्याचांदीचे दागिने असलेली पर्स,10 हजारांची रोकड, तसेच सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण एक लाख 83 हजार 200 रुपयांचा ऐवज हिसकावून पोबारा करण्याच्या प्रयत्नात होते. याबाबत हिंजवडी पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी महामार्गावर धाव घेत आरोपी महिलांना ताब्यात घेतले.

हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, उपनिरीक्षक नंदराज गभाले, पोलीस कर्मचारी अविनाश सगर, तानाजी टकले, विजय बंजत्री, रेखा धोत्रे, तेजश्री म्हैशाले, भाग्यश्री जमदाडे, पुनम आल्हाट यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

बंगळुरू-मुंबई महामार्गावर लुटमार
आरोपी महिला मूळच्या सोलापूर येथील आहेत. मुंबई-बेंगळुरू महामार्गावर लहान मुलांना सोबत घेऊन बसने प्रवास करून दागिने तसेच माैल्यवान ऐवज असलेल्या प्रवासी महिलेशी आरोपी वाद घालत. भांडणादरम्यान गोंधळाचा फायदा घेऊन एक आरोपी महिला दागिने, रोकड, माैल्यवान वस्तूंची चोरी करीत असे. महामार्गावरील कराड, सातारा, चांदणी चाैक, वाकड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अशा पद्धतीने आरोपींनी बऱ्याच चोरी केल्याची शक्यता आहे.