गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टेंच्या मुलाला अटक, जाणून घ्या प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रीय समाज पक्षाकडून पण भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणारे, तसेच राज्यात शुगर बॅनर म्हणून ओळखले जाणारे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या मुलाने ५२० कोटींच्या जीएसटीला चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुनील गुट्टे यास अटक करण्यात आली असून, न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

सुुनील हायटेक इंजिनिअरिंग लिमिटेडचे संचालक म्हणून बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा ( आयटीसी ) वापर आणि दुसऱ्याला दिल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली. वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता बोगस पावत्यांच्या आधारे ५२०कोटी आयटीसी मिळवल्याचा आरोप सुनील यांच्यावर आहे.

केवळ टॅक्स क्रेडिट नाहीत तर कंपन्यांची उलाढाल कृत्रिमरित्या वाढवून दाखविण्यासाठी या बोगस बिलांचा वापर करण्यात आला. त्याचा उपयोग कर्जाची मर्यादा आणि बँकेकडूनही जादा कर्ज मिळण्यासाठी झाला. या साऱ्या प्रकारात सुनील हायटेक एक प्रमुख असल्याचे डीजीसीआयने म्हटले आहे. सुनील हायटेक ही कंपनी २०१९ मध्ये दिवाळखोरीत निघाली आहे. सुमारे २३०० कोटी रुपयांचे देणे या कंपनीकडे थकीत आहे.

श्री ओशिया फेरा अलाॅय लिमिटेडवरही गुन्हा
सुनील यांच्याशिवाय श्री ओशिया फेरा अलाॅय लिमिटेडचे विजय रांका यांनाही अटक करण्यात आली आहे. रांका यांच्या कंपनीने सुमारे १३७१कोटी रुपयांची बिले सादर केली होती. त्यातून सुमारे २०९ कोटींचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतले. सुनील आणि रांका या दोघांनाही जीएसटी कायद्याच्या कलम ६९ (१) नुसार कारवाई करण्यात आली. मालाचा कोणताही पुरवठा न करता बोगस बिले तयार करून इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

गुट्टे कुटुंबातील सदस्यांवर यापूर्वीही कारवाई
सुनील यांचे भाऊ विजय गुट्टे यांनाही अशाच एका प्रकरणात अटक झाली होती. त्यांच्यावर सुमारे ३४ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला होता. विजय गुट्टे यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावरील द ऑक्सिडेंटल प्रायमिनिस्टर, हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

तर रत्नाकर गुट्टे यांची गंगाखेड शुगर फॅक्टरीवरही मनी लाॅडरिंग अंतर्गत सक्तवसुली संचालनालयाने कारवाई केली होती. या कंपनीने आंध्रा बॅंक, युको बॅंक, युनायटेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ इंडिया, सिंडिकेट बॅंक यांचे तब्बल ३२८ कोटी रुपये थकविले होते.