भक्तांच्या उपस्थितीत ‘गंगोत्री’, ‘यमुनेत्री’चे उघडले दरवाजे, चारधाम यात्रा सुरू

उत्तरकाशी : वृत्तसंस्था – गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरांचे दर रविवारी (दि.26) अक्षय तृतीयेच्या शुभ पर्वावर उघडण्यात आली. यासोबतच वार्षिक चारधाम यात्रेलाही सुरुवात झाली. तथापि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भाविकांना यात सहभागी होता येणार नाही. या दोन्ही मंदिरामध्ये रविवारी काही निवडक पुजारी, मंदिर प्रशासन समितीतील सदस्य आणि साधू-संत उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. गंगोत्री मंदिर दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी तर यमुनोत्र मंदिर 12 वाजून 41 मिनिटांनी उघडण्यात आल्याची माहिती, उत्तरकाशीचे जिल्हाधिकारी आशिष चौहान यांनी दिली.

आज गंगा पूजन, गंगा सहस्त्रनाम पठण आणि विशेष पूर्जा अर्चना केल्यानंतर वैदिक मत्रोच्चारांसह रोहणी अमृत योगाच्या शुभमध्यावर दुपारी गंगोत्रीचे दरवाजे उघडण्यात आले. केदारनाथ मंदिर देखील 29 एप्रिल रोजी उघडण्यात येणार आहे. तर बद्रीनाथ मंदिर 15 मे नंतर उघडण्यात येणार आहे. कोरोनामुळे यावर्षी पहिल्यांदाच चारधाम यात्रा भाविकांविना सुरु झाली आहे.

काल शनिवारी आई गंगेची पालखी मुक्कामासाठी भैरोघाट येथे आली आणि रात्रीच्या विश्रांतीनंतर सकाळी गंगोत्री येथे पोहचली. जिथे गंगेची भोगी मूर्ती मंदिरात पूर्ण विधीपूर्वक स्थापित करण्यात आली. दुसरीकडे यमुनोत्री धामच्या मंदिरात देखील सकाळी विशेष प्रर्थना आणि वैदिक स्त्रोत्रांचा जाप झाला.
यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे प्रथम पूजा संपन्न झाली.

जिल्हाधिकारी डॉ. आशिष चौहान म्हणाले की, कोरोना विषाणूमुळे आणि देशव्यापी लॉकडाऊनमुळे भार सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दोन्ही धामचे दरवाजे उघडण्यात आले. तत्पूर्वी, दोन्ही धाममध्ये मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. डी.पी. जोशी यांच्या नेतृत्वात वैद्यकीय पथकाने उद्घाटन सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व यात्रेकरुंची वैद्यकीय तपासणी केली. तसेच सॅनिटायझर, मास्क इत्यादींची पुरेशी व्यवस्था या दोन्ही ठिकाणी करण्यात आली होती.