रिमोट कारमधील गणपतीची विसर्जन मिरवणूक ठरली लक्षवेधी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील एका डॉक्टरांनी चक्क खेळण्यातल्या कारमधून गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक काढली होती. कुमठेकर रोडवरील या घरगुती गणपतीचा बाप्पांचा विसर्जन सोहळा लक्षवेधी ठरला. पुणेकरांना कधी काय सुचेल हे सांगता येत नाही. याचाच प्रत्यय विसर्जन मिरवणूकीत आला. सर्वसाधारणपणे ट्रक, ट्रॉली, हातगाडीमधून किंवा डोक्यावर मूर्ती घेऊन गणपती विसर्जन मिरवणूक काढली जाते. परंतु, ही आगळीवेगळी मिरवणूक सध्या चर्चेचा विषय झाली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’95169204-bfaa-11e8-8d41-ff8d9237405c’]

कुमठेकर रोड येथे राहणारे डॉ. मिलिंद संपगावकर यांनी आपल्या दहा दिवसांच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या कारमधून काढली होती. फुलांनी सजवलेली ही कार ते रिमोटने ऑपरेट करत होते. आगळ्या वेगळ्या पद्धतीने निघालेल्या या मिरवणूकीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. डॉ. मिलिंद संपगावकर यांनी आपल्या या हटके प्रयोगाबाबत सांगितले की, सहा महिन्यांपूर्वी माझ्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे गणपती उचलून नेणे शक्य नव्हते तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रॉनिक कारचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्याविषयी जनजागृती करण्यासाठी विसर्जनासाठी मी इलेक्ट्रॉनिक कारचा पर्याय निवडला. विसर्जनाचा हा अत्यंत कमी खर्चिक असा पर्याय असून मुलांसाठी ही कार आधीच खरेदी केली होती, असे ते म्हणाले.

राज्यभरात गणेश विसर्जनादरम्यान १६ जणांचा बुडून मृत्यू, पुणे जिल्ह्यात पाच जण बुडाले