जनुकांमुळेही बदलू शकते संसाराचे गणित

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तुम्ही तुमच्या विवाहात आनंदी, सुखी-समाधानी असाल तर तुमचा संसार टिकतो आणि संसार चांगला चालणार की नाही, हे अर्थातच पती-पत्नीचा स्वभाव, आपापसातील ताळमेळ, संवाद यावर अवलंबून असते. मात्र, केवळ जोडीदाराचा स्वभावच नाही तर तुमच्या जनुकांचीदेखील तुमचे वैवाहिक आयुष्य दशा-दिशा ठरविण्यात निर्णायक भूमिका असते, असा दावा संशोधकांनी केला आहे.
अमेरिकेच्या कनेक्टिकट येथील येल विद्यापीठातील अभ्यासकांनी यावर संशोधन केले आहे. विद्यापीठाच्या येल स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील संशोधकांनी यासाठी ३७ ते ९० वर्षे वयातील १७८ जोडीदारांचा अभ्यास केला. या लोकांच्या वैवाहिक आयुष्याबाबतची सविस्तर माहिती अभ्यासकांनी गोळा केली.

त्यासोबतच जनुकीय चाचणीसाठी त्यांच्या लाळेचे नमुनेही घेतले. संशोधकांनुसार ज्या लोकांच्या शरीरातील ऑक्सिटॉसिन हार्मोनमध्ये जीजी जिनोटाइप असतो ते लोक आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल इतरांच्या तुलनेत अधिक आनंदी असतात. जोडीदारांपैकी एकाच्या जरी शरीरात हा जीजी जिनोटाइप असला तरी त्या दाम्पत्याचे वैवाहिक आयुष्य आनंदी राहण्याची शक्यता तो विशेष जनुके नसलेल्या लोकांच्या तुलनेत अधिक असते. या जनुकांचा वैवाहिक आयुष्याशी असलेल्या संबंधाबाबत प्रथमच संशोधन झाले आहे.

यापूर्वी ऑक्सिटॉसिनमधील ओएक्सटीआर आरएस५३५७६ चा संबंध व्यक्तीचे भावनिक स्थैर्य, सहानुभूती, मनमिळाऊपणा अशा व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंशी जोडण्यात आला होता. ऑक्सिटॉसिन हार्मोन अर्थात संप्रेरकाचा संबंध व्यक्तीच्या सोशल बॉडिंगशी असतो. हे संप्रेरक लव्ह हार्मोन म्हणून ओळखले जाते.