‘ही’ त्रिसूत्री पाळूनच घराबाहेर पडा, टास्क फोर्सचा सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात चाचण्या वाढवल्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहचण्यात यंत्रणांना यश येत आहे. म्हणून नागरिकांनी घाबरुन न जातात मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे, आणि सतत सॅनिटायझरचा वापर करणे या त्रिसूत्रीचा अवलंब केला पाहिजे, असा सल्ला टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी दिला आहे.

ऑगस्ट महिन्यात कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्याचं दिसत होत. मात्र, सप्टेंबरच्या पहिल्या सात दिवसांमध्ये राज्यात तब्बल १ लाखांहून अधिक बाधित रुग्णांची भर पडली आहे. तसेच मुंबईत या काळात १० हजार हुन अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यापाठीमागे चाचण्यांची वाढ तसेच जिल्हा बंदी आणि अनलॉक ४ मध्ये बऱ्याच प्रमाणात देण्यात आलेली सूट हे देखील कारण असू शकते, अशी माहिती कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे विश्लेषण करणे आणि त्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी नेमलेल्या मुंबई टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.

डॉ. सुपे यांनी म्हटलं की, मुंबईसह राज्यात ही कोरोनाची दुसरी लाट नाही. म्हणून नागरिकांनी घाबरून न जाता आपला जो काही व्यवसाय, नोकरी, दिनक्रम असेल तो करताना काळजी घ्यावी. अतिजोखीम आजार असलेल्या तसेच जेष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घेतली पाहिजे. अत्यावश्यक सेवा शिवाय बाहेर जाता कामा नये. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी त्रिसूत्रीचा वापर केलाच पाहिजे.

तसेच प्रत्येकाने रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवली पाहिजे. योग्य आहार, पुरेशी झोप, योग्य व्यायाम गरजेचा आहे. सिझनल इन्फेक्शन जसे, डेंग्यू व मलेरिया या सर्वांवर मात करायची असेल तर प्रतिकारशक्ती चांगली पाहिजे असे डॉ. सुपे यांनी सांगितलं.

राज्यात रुग्णसंख्येचा आलेख वाढतच

सोमवारी राज्यात १६,४२९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर १४,९२२ रुग्णांना उपचारानंतर सोडून देण्यात आले असून, आतापर्यंत राज्यात ६,५९,३२२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. सध्या २,३६,९३४ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ७१ % टक्के झाला आहे.