…तर ‘त्या’ दिवशी अमळनेरमध्ये अजून वाईट काहीतरी झालं असतं : गिरीश महाजन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अमळनेर येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्यात जोरदार राडा झाला होता. याबाबत भाजपचे ‘इनकमिंग मास्टर’ भाजप नेते गिरीश महाजन यांनी मोठा खुलासा एका वृत्तसमूहाशी बोलताना केला आहे. यावेळी ‘मी तिथे नसतो तर आजून काहीतरी वाईट झाले असते’ असे गिरीश महाजन यांनी म्हंटले आहे.

यावेळी अमळनेर प्रकरणाबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले, “अमळनेरमधील हाणामारीचा अर्थ वेगळा होता. हा प्रकार अत्यंत वाईट आणि अनपेक्षीत होता. स्मिता वाघ यांना एकमताने तिकीट दिलं होतं. परंतु तिकीट वाटपाचं जजमेंट चुकल्याचे गिरीश महाजन यांनी कबूल केले. मी, उदय वाघ आणि डॉ. बी. एस. पाटील आम्ही तिन्ही एकाच गाडीतून आलो होतो. तेव्हा सर्व काही ठीक होते, परंतु बी. एस. पाटील यांचं विधान चुकीचे होते. त्याचं समर्थन करणार नसल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. मी पुढे आलो नसतो तर अमळनेरमध्ये अजून वाईट झालं असतं”, असंही गिरीश महाजन यांनी सांगितले.

दरम्यान, अमळनेर प्रकरण राज्यभरात एवढे गाजले की विरोधकांनी या मारहाण प्रकरणावरून भाजप सरकारला टीकेचे लक्ष्य केले. या मारहाणीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

काय आहे प्रकरण ?

अमळनेरमध्ये बुधवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सुरुवातीला उदय वाघ आणि बी. एस. पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली. मग या वादाचं पर्यवसन हाणामारीत झालं. मंचावरच दोन्ही नेते भिडले. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बी. एस. पाटील यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. उदय वाघ यांच्या समर्थकांनी यावेळी स्मिता वाघ आगे बढो, अशी घोषणाबाजीही केली.

हा गोंधळ पाहता जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी स्वत:चे प्राण धोक्यात घालत माजी आमदार पाटील यांचा जीव वाचविण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांना व्यसपीठावरुन खाली ढकलले. यावेळी ते अन्य कार्य़कर्त्यांनाही दूर केले. या हाणामारीत महाजन यांनी तत्परता दाखविली नसती तर मेळाव्यातच अघटित घडण्याची शक्यता होती.