लंगोट वेळेवर शिवून अंगाला तेल लावले की आम्ही कुस्ती जिंकतो

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या बाबतीत बोलताना भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी भलतेच उदाहरण दिले आहे. ‘भाजप-शिवसेनेची युती व्हावी, अशी इच्छा व प्रयत्न आहेत. मात्र, मित्रपक्ष सेनेचे मंत्री लंगोट बांधून तयार असल्याच्या घोषणा करताहेत. मंत्री गुलाबराव पाटील हे पट्टीचे पहिलवान आहेत. ते लंगोट बांधून नव्हे, तर खिशात घेऊन फिरतात. आम्ही मात्र नेहमीच कुस्तीसाठी तयार असतो. आमच्याकडे कापड तयार असतेच. वेळेवर लंगोट शिवून अंगाला तेल लावले की आम्ही कुस्ती जिंकतो, अशी टोचणी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेनेला शुक्रवारी लावली. जळगावातील एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना, ते म्हणाले की, युतीची गरज भाजपसोबतच शिवसेनेलाही आहे. दोन्ही पक्षांचा त्यात फायदा आहे. वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू आहे. त्यामुळे यावर अधिक बोलणे योग्य नाही. परंतु, शिवसेना लंगोट बांधून तयार असेल तर आम्हीही मैदान मारायला सक्षम आहोत. आम्ही युतीचे जर-तर गृहीत धरून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या वेळीही विजय आमचाच होईल, असेही ते म्हणाले.

अजित पवार पदावर येण्यासाठी उतावीळ

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना आमच्या सरकारने केलेले कोणतेही काम चांगले वाटणार नाही. ते सत्तेत आणि पदावर येण्यासाठी उतावीळ असून धडपडत आहेत. विरोधात काम करताना त्यांची दमछाक होत आहे. त्यांच्याकडून आम्हाला चांगल्या निर्णयाबद्दल काैतुक किंवा शाबासकीची अपेक्षा नाही. ते चांगल्याला चांगले म्हणू शकत नाहीत. त्यांनी स्वत: काहीही केले नसल्याचे ते म्हणाले.