माहेश्वरी समाजातील 2 कुटूंबांनी ठेवला सर्वांसमोर ‘आदर्श’, मुलगी पहायला गेले अन् लग्न उरकूनच आले

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – चट मंगनी पट शादी, असा काहीसा आगळावेगळा, पण आदर्शवत विवाह सोहळा जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील कासोदा गावात पार पडला आहे. येथे मुलगी पहाण्यासाठी आलेले पाहुणे, वधूला घेऊनच परतले. मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात कुणीतरी म्हटले की आजच लग्न उरकूयात का? यानंतर उपस्थित ज्येष्ठ मंडळींनी विचारविनिमय करून लग्नही उरकण्याचा निर्णय घेतला. येथील बालाजी मंदिरात समाजबांधवांच्या साक्षीने विवाह सोहळा रुढी परंपरांना फाटा देत आणि मुहूर्त वगैरे न पाहता पार पडला. एका दिवसात मुलगी पाहणे ते लग्न असा कार्यक्रम झाल्याने सध्या एरंडोलमध्ये या लग्नाची चर्चा सुरू आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कसोदा गावात माहेश्वरी समाजातील मुलीला पाहण्यासाठी पाहुणे आले होते. त्यांनी मुलगी पसंत पडली. तेवढ्यात एकाने प्रस्ताव ठेवला की, आत्ताच लग्न करावे काय ? यानंतर दोन्हीकडच्या प्रमुख ज्येष्ठ मंडळींनी विचाराअंती होकार दिल्यानंतर बालाजी मंदिरात हा विवाह सोहळा पार पडला. लग्न सोहळ्यावर लाखो रूपयांची उधळण करून आपल्या संपत्तीचे ओंगळ दर्शन घडविणार्‍यांसाठी तसेच विवाहासाठी कर्ज काढून देखावा करणारे आणि पैसे नाहीत म्हणून विवाह कसा पार पाडायचा, अशी चिंता करणार्‍यांना या विवाहाने योग्य मार्ग दाखवत आदर्श समोर ठेवला आहे.

कासोदा नववधू फॅशन डिझायनर आहे तर वर रोहित हा एमसीए आहे. मुलीच्या वडीलांचे नाव प्रदीप हिरालाल झवर तर मुलाच्या वडीलांचे नाव शरद रामनाथ बिहानी (बेलापूर, श्रीरामपूर) असे आहे. या उच्च शिक्षित वधु-वराचा विवाह एकाच दिवसात समाज बांधवांच्या साक्षीने कुठलाही पारंपरिक रितीरिवाज व मोठा खर्च न करता वरमाला टाकून रितसर करण्यात आला.

मुलाचे मामा मिलिंद मुंदडा, मुलीचे आजोबा गणपती झवर, झवर यांचे जावई सतीश राठी यांनी यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. कासोदा माहेश्वरी समाज मंडळ व माहेश्वरी महिला मंडळाने दोन्हींकडील परिवाराचा सार्वजनिक सत्कार केला. तसेच हा विवाह पार पडण्यासाठी सहकार्य करणार्‍या मंडळींचाही सत्कार करण्यात आला. यावेळी माहेश्वरी समाज अध्यक्ष शीतल मंत्री, संजय नवाल, मधुकर समदाणी, जयप्रकाश समदाणी, अनिल मंत्री, डॉ. टावरी, कैलास अग्रवाल यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.