‘फोन’ करण्याची गरज नाही ; भाजपमध्ये येण्यासाठी ‘रांग’ : गिरीश महाजनांचा चव्हाणांवर ‘पलटवार’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असण्याचा दावा करण्याऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टीका करताना मोठा गौप्यस्फोट केला होता. यावेळी टीका करताना ते म्हणाले होते कि, मुख्यमंत्री काँग्रेस आमदारांना फोन करतात आणि पक्षात येण्यासाठी संपर्क करतात. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती.

त्यानंतर आता यावर पलटवार करत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी अशोक चव्हाण यांना प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही काँग्रेसच्या आमदारांना फोन करण्याऐवजी तेच आमच्या संपर्कात आहेत आणि स्वतः फोन करत असतात. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे असून आमदार आघाडीत राहण्यासाठी तयार नसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, याआधी माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा देत भाजप प्रवेशाची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आरोप करताना म्हटले होते कि, मुख्यमंत्र्यांचा फोन आला म्हणजे देवाचा फोन आला असे अनेक जणांना वाटते.

त्यामुळे कोणत्याही आमदाराने काळजी करण्याची गरज नाही. कोणताही आमदार पक्ष सोडून जाणार नाही. सर्व आमदार माझ्या संपर्कात असून ते कुठेही जाणार नाहीत. त्यामुळे आता गिरीश महाजन यांनी केलेल्या आरोपांवर अशोक चव्हाण काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.