पती सुधारला नाही, माझी किडनी मला परत द्या, पतीविरोधात पत्नी पोलिसात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – लग्नाच्या काही दिवसांतच पती आजारी पडला. दारूच्या व्यसनामुळे पतीच्या दोन्ही किडन्या निकमी झाल्या. आपला संसार सुखाचा होईल म्हणून नातेवाईकांचा विरोध झुगारून पत्नीने त्याला एक किडनी दिली. त्यानंतर पती पुन्हा दारूच्या आहारी गेला आणि छळ करू लागला. त्यानंतर दारूच्या व्यवसानाला आणि छळाला वैतागून पत्नीने पती विरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. तिने आपण दिलेली किडनी परत देण्याची मागणी करत पतिविरोधात तक्रार केली आहे. परंतु यामुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत.

विक्रम वडतिले याच्याविरोधात त्याची पत्नी वैशाली (वय २७) हिने तक्रार केली आहे.

विक्रमला दारूचे व्यसन होते. त्याउपरही आई वडिल आणि नातेवाईकांच्या आग्रहामुळे वैशालीने त्याच्याशी लग्न केले. काही दिवसांनंतर विक्रम आजारी पडला. त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असं डॉक्टरांनी सांगितले. मात्र आपल्या जोडीदाराचा जीव धोक्यात असल्याचे समजल्यावर तिने संसार सुखाचा व्हावा यासाठी आपली एक किडनी पतीला दिली. नातेवाईकांचा विरोध असतानाही तिने किडनी दिली.

मात्र किडनी प्रत्यारोपण झाले आणि विक्रम ठणठणीत होऊन घऱी परतला. परंतु विक्रम पुन्हा दारूच्या आहारी गेला आणि वैशालीचा छळ सुरु झाला. त्यामुळे वैशातील वैतागली आणि तिने थेट पती विक्रम विरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली. आपली किडनी आपल्याला परत मिळावी अशी मागणी तिने पोलिसांकडे केली आहे. या तक्रारीनंतर पोलीसही चक्रावून गेले आहेत.