गिरणी कामगारांना घरकूल योजनेतून घरे ; फडणवीस सरकारचे आश्वासन 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील गिरणी कामगारांचा प्रलंबित प्रश्नावर फडणवीस सरकारकडून लवकरच उत्तर मिळणार असे दिसते आहे. या सर्व गिरणी कामगारांना शासनाच्या विविध घरकूल योजनेतून घरे देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अथितीगृह येथे गिरणी कामगार कृती संघटनेच्या शिष्टमंडळाने गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नासंबंधी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरणी कामगार कृती संघटनेच्या शिष्टमंडळाला ही ग्वाही दिली.

यावेळी फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत तयार होणाऱ्या घरांमधील काही घरे गिरणी कामगारांना देणार असल्याचे सांगितले. ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका हद्दीतील एमएमआरडीएची घरे गिरणी कामगारांना देण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या असल्याचे ते म्हणाले. तर गिरणी कामगारांना म्हाडामधून लॉटरी पद्धतीने ही घरे देणार असल्याचे सांगितले.

तर, रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे शासनाच्या तयार असलेल्या घरामधूनही काही घरे गिरणी कामगारांना देण्यासाठी  संबंधितांना आदेश देण्यात आले. याचबरोबर गिरणी कामगारांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी महसूल व कामगार विभागांना सूचना देण्यात आल्या. शासनाच्या विविध घरकूल योजनांमधूनही कालबद्ध कार्यक्रमातून गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.