भारताचा आंतरराष्ट्रीय गोल्फर ज्योती रंधावाला अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अवनी वाघाच्या शिकारीत सहभागी असलेला भारताचा आंतरराष्ट्रीय गोल्फर ज्योती रंधावा याला अवैध शिकार प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील बहराईचमध्ये त्याला पोलिसांनी अटक केली. उत्तर प्रदेशातील मोतीपूर वनक्षेत्राच्या कटरनिया घाट परिसरात अवैध शिकार केल्याचा रंधावावर आरोप आहे.

रंधावाच्या गाडीतून पोलिसांनी २२ ची एक रायफल जप्त केली आहे. तसंच, वन्यप्राण्यांचे काही अवशेषही त्याच्याकडं सापडले आहेत. रंधावा याचा मोतीपूर भागात एक फार्म हाउस आहे. गेल्या तीन दिवसांपासून तो आपल्या गाडीतून या भागात फिरत होता. त्याच्या सोबत असलेल्या माणसांची वर्तणूक संशयास्पद आढळून आली. यानंतर त्यांना जंगलातही बघितलं गेलं होतं, अशी माहिती दुधवा वनक्षेत्राचे संचालक रमेश पांडे यांनी दिली.

अवनी प्रकरणात सहभागी
जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीला जेरबंद किवा ठार मारण्याच्या ‘मिशन टी-1 कॅपचर’ मोहिमेत प्रसिद्ध शार्प शूटर नवाब शाफत अली खान सोबतच आंतरराष्ट्रीय गोल्फ पटू ज्योती रंधावा त्यांच्या दोन प्रशिक्षित इटालियन कुत्र्यांसह सहभागी झाले होते. रंधवा हे गोल्फपटू तर आहेत, शिवाय श्वान प्रशिक्षकही आहेत.

ज्योती रंधावाचे बॉलीवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंगसोबत लग्न झाले होते. पण आता त्यांचा घटस्फोट झाला आहे. चित्रांगदाने गोल्फपटू ज्योती याच्याशी २००१साली विवाह केला होता. त्यांना पाच वर्षांचा झोरावर रंधावा हा मुलगा आहे.