गोलमाल है भाई सब गोलमाल है… रात्रीत बुजले खड्डे अन् स्पीड ब्रेकरवर आले पट्टे

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – सांगली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. आता या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कवलापूर ते जिल्हाधिकारी कार्यालय या रस्त्यावरील खड्डे रातोरात गायब झाले आहेत.  एवढेच नाही तर या रस्त्यावरील स्पीड ब्रेकरवर पट्टेही मारण्यात आले आहेत. तसेच हा रस्ता आणि परिसर स्वच्छ करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावण्यात आली होती . त्यामुळे मुख्यमंत्री येण्याच्या आधी सांगली प्रशासन हडबडून जागे झाले आहे.

जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री बुधवारी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत . त्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासूनच सर्व यंत्रणा कामाला लावण्यात आलेली होती.  मुख्यमंत्री कवलापुर येथून कुपवाड- वसंतदादा सूतगिरणी- चाणक्य हॉटेल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात येणार असल्याने या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम मंगळवारी रात्री उशिरा पर्यंत सुरू होते. जिल्हाधिकारी कार्यालय ते चाणक्य हॉटेल  हा एक किलोमीटरचा रस्ता सहा महिन्यांपूर्वीच करण्यात आलेला आहे. यासाठी एक कोटी वीस लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत तरीसुद्धा अल्पकालावधीतच रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्याशिवाय या रस्त्यावर असलेल्या स्पीड ब्रेकरवर ते पट्टे मारण्यात आलेले नव्हते .या स्पीडब्रेकरमुळे अपघात होत असल्याने पट्टे मारण्यात यावे आणि खड्डे बुजवावेत अशी मागणी परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी केली होती. मात्र बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले होते.

आता मुख्यमंत्री येत असल्याने या रस्त्याचे भाग्य उजळले आणि मंगळवारी रात्री या स्पीड बेकर वरती पट्टे मारण्यात आले. त्याशिवाय हा रस्ता आणि रस्त्यालगतचा परिसर  स्वच्छ करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावण्यात आलेली होती.  मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे आपल्या परिसराची स्वच्छता पाहून मुख्यमंत्र्यांनी असे दौरे वरचेवर करावे अशी अपेक्षा नागरिकांच्या तून व्यक्त होत आहे.