कर्मचार्‍यांसाठी चांगली बातमी ! EDLI अंतर्गत विम्याची रक्कम आता 7 लाख रूपये

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. असे असतानाच केंद्र सरकारने कर्मचार्‍यांना दिलासा देणारा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) विश्वस्त मंडळाने एम्‍प्‍लॉय डिपॉजिट लिंक्‍ड इन्सुरन्स स्कीम 1976 अंतर्गत विम्याची रक्कम 6 लाखांवरून 7 लाख रुपये केली आहे. याबाबत कामगार मंत्री संतोष गंगवार म्हणाले की, EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने 9 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या बैठकीत EDLI योजनेत विम्याची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कामगार व रोजगार मंत्रालयाने 28 एप्रिल 2021 रोजी ईडीएलआय योजनेअंतर्गत जास्तीत जास्त विमा रक्कम 7 लाखांपर्यंत वाढविण्याच्या निर्णयाची अंमलबजावसाठी अधिसूचना जारी केली आहे.

कामगार सचिव अपूर्व चंद्रा म्हणाले की, अधिसूचनेच्या तारखेपासून विमा रक्कम लागू होणार आहे. तसेच किमान विमा रक्कम 2.5 लाख रुपये 15 फेब्रुवारी 2020 पासून लागू होईल, असे ते म्हणाले. कामगार व रोजगार मंत्रालयाने 15 फेब्रुवारी 2018 रोजी एका अधिसूचनेद्वारे, ईडीएलआय अंतर्गत किमान विमा रक्कम अडीच लाखांपर्यंत वाढविली होती. सदर वाढ ही दोन वर्षांसाठी केली होती. याचा कालावधी 15 फेब्रुवारी 2020 रोजी संपला होता. त्यामुळे 15 फेब्रुवारी 2020 पासून पुढे चालू ठेवण्यास आणि आधीच्या तारखेपासून अंमलात आणण्यासाठी दुरुस्तीला पुन्हा अधिसूचित केले आहे. तसेच ईडीएलआय योजना,1976 च्या परिच्छेद -22(3) मधील दुरुस्तीचा उद्देश सेवेत असताना दुर्दैवाने मृत्यू झालेल्या योजनेतील सदस्यांच्या कुटुंबीयांना व त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना दिलासा देण्याचा आहे. मार्च 2020 मध्ये सीबीटीच्या बैठकीत ईपीएफओ विश्वस्तांनी सेवेदरम्यान मृत्यू झालेल्या मृत कर्मचार्‍याच्या कुटुंबीयांना किमान 2.5 लाख रुपयांचा लाभ देण्याची शिफारस केली आहे.