Google वर Oxygen सोबतच सर्वाधिक सर्च होतायत ‘हे’ शब्द

पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी नोंद होत आहे. बुधवारी (दि. 21) देशात 3 लाख 14 हजार 835 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑनलाइन सर्च पॅटर्नमध्येही मोठा फरक दिसून येत आहे. सध्या बहुतांश लोक कोरोनाशी निगडीत बाबी सर्च करताना दिसत आहेत. युझर्सद्वारे केलेल्या सर्चमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन, आरटी-पीसीआर टेस्ट, ऑक्सिजन सिलिंडर, रुग्णालयात बेड आदी कीवर्डसचा समावेश आहे.

याबाबतचा डेटा इंडियन एक्स्प्रेसने गोळा केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील लोकांनी सर्वाधिक वेळा रेमडेसिवीर नियर मी असे सर्च केले आहे. तर दिल्लीतील लोकांनी ऑक्सिजन सिलिंडर नियर मी, कोविड आरटी पीसीआर टेस्ट नियर मी आणि कोविड हॉस्पीटल नियर मी असे सर्च केल्याचे समोर आले आहे. तसेच 7 ते 13 मार्चदरम्यान लोकांनी सर्चमध्ये आणखी एक टर्म वाढवली आहे. या दरम्यान लोकांनी कोविड वॅक्सिनेशन सेंटर नियर मी असे सर्च केल्याचे समजते.

कोरोनाशी निगडीत या आवश्यक बाबींबाबत सर्च करणाऱ्या लोकांनी गुगल व्यतिरिक्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्म्सचीही मदत घेतली आहे. या ठिकाणी लोक पोस्ट टाकून आपल्या ओळखीच्या लोकांची किंवा नातेवाईकांची मदत घेत आहेत. 7 एप्रिलपर्यंत मिळालेल्या डेटानुसार प्रत्येक तासाला तब्बल 200 पेक्षा अधिक वेळा रेमडेसिवीर हा शब्द सर्च केल्याचे समोर आले आहे.