‘गुगल प्लस’ व्हेंटिलेटरवर… ‘या’ तारखेला होणार बंद

असे नष्ट करा ‘गुगल प्लस’चे खाते

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – मागील वर्षापासूनच ‘गुगल प्लस’ची सेवा बंद करण्यात येणार असे गुगलने संगितले होते. त्यानुसार आता ‘गुगल प्लस’ पुढील महिन्यापासून बंद होणार आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवरील सर्व युजर्सचा डेटा २ एप्रिल पासून काढण्यात येणार आहेत. आता इंटरनेट अर्काइव्ह आणि अर्काइव्ह टीमने ‘गुगल प्लस’वरील सर्व सार्वजनिक पोस्ट साठवून ठेवण्याचे काम आरंभले आहे. दरम्यान, युजरला आपले अकाउंट नष्ट करण्याबाबत कंपनीतर्फे आवाहन देखील करण्यात आले आहे.

डेटा साठवण्यासाठी कंपनीकडून निमंत्रण

दरम्यान ‘गुगल प्लस’वरील सर्वच माहिती अर्काइव्हमध्ये साठवून ठेवण्यात येणार नाही. कोणत्याही प्रकारच्या खासगी पोस्ट आणि यापूर्वी नष्ट करण्यात आलेला गोपनीय स्वरूपाचा मजकूर साठवता येणार नसल्याचेही कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले. याशिवाय ५००पेक्षा अधिक प्रतिक्रिया असलेल्या पोस्टही अर्काइव्हमध्ये समाविष्ट करण्यात येणार नाहीत. मात्र, फोटो आणि व्हिडिओलो रिझोल्युशनमध्ये साठवून ठेवण्यात येणार आहे. कंपनीच्या व्यतिरिक्त ज्यांना ‘गुगल प्लस’चा डेटा साठविण्याची इच्छा आहे, त्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

का होणार ‘गुगलप्लस’ बंद ?

नेमक्या कोणत्या कारणामुळे ‘गुगल प्लस’ची सेवा बंद करण्यात येणार असल्याबाबत कंपनीने खुलासा केला नसला, तरी एक सुरक्षाविषयक समस्या उद्‌भवल्यानंतर ही घोषणा करण्यात आली होती. ‘गुगल प्लस’च्या सेवेविषयी ‘गुगल’ला विचारणा केली असता, यूजरकडून मिळालेल्या प्रतिक्रिया लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीच्या मते सोशल प्लॅटफॉर्मवरील यूजरच्या वेळेत कमालीची घट होत आहे. गेल्या महिन्यात कंपनीने नव्या यूजरसाठीचे ‘साइन अप’ आणि ‘गुगल प्लस’वर नवे पेज अथवा नवी कम्युनिटी तयार करण्याचे फीचर मागे घेतले. कंपनीच्या मते साइटवरील डेटा २ एप्रिल २०१९पासून हळूहळू का होईना हटविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाईल.

कसे नष्ट कराल ‘गुगल प्लस’चे खाते

‘गुगल प्लस’चे अकाउंट नष्ट करण्याची प्रक्रिया अतिशय सुलभ आहे. plus.google.com/downgrade या लिंकवर जीमेल अकाउंटचा आयडी आणि पासवर्ड टाकून ओपन करा. त्यानंतर ‘गुगल’ सेवा खंडित करण्याचा पर्याय दिसेल. त्यानंतर ‘गुगल प्लस’च्या पर्यायाची निवड करा. त्यानंतर एक विंडो उघडेल. त्यावर ‘आपण गुगल प्लस’चे खाते नष्ट करण्याच्या पर्यायाची निवड केली आहे,’ असे लिहिलेले दिसेल. तेथे तुमच्या ‘गुगल अकाउंट’चे सर्व तपशील दिसतील. त्यानंतर पब्लिक गुगल प्लस प्रोफाइल नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतर सर्वात खाली असणाऱ्या जागी बरोबर अशी खुण करून ‘Delete Google +’चा पर्याय निवडावा. या सर्व प्रक्रियेनंतर ‘गुगल प्लस’चे अकाउंट नष्ट होईल आणि तसा मेसेज तुमच्या स्क्रीनवर दिसेल.