‘रोहित पवारांना ‘पोस्टर बॉय’ बनवायचंय का ?’, पडळकरांचा सवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते जेजुरी येथे उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव रोहित पवार यांच्या मतदारसंघात असल्याचे म्हटले होते. यावरुन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. त्यानंतर पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. पडळकर यांनी केलेल्या फेसबूक पोस्टमधून रोहित पवार यांना अहिल्यादेवी स्मारक उभारणीत ‘पोस्टर बॉय’ बनवायचे आहे का ? असा सवाल केला आहे.

पई पाव्हण्याचं सरकार

गोपीचंदर पडळकर यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, राज्यातील पई पाव्हण्याचं सरकार आहिल्यादेवींच्या स्मारकांचा फक्त राजकारणासाठी वापर करणार असल्याचे दिसून येतंय. आधीच्या स्मारक समिती सूडबुद्धीने बरखास्त करण्यात आली आहे. या समितीत एकाच पक्षाचं वर्चस्व राहिलं आहे, अशी टीका करताना अहिल्यादेवी स्मारक उभारणीत तुम्हाला रोहित पवारांना ‘पोस्टर बॉय’ बनवायचे आहे का ? असा सवाल त्यांनी केला आहे.

ये पब्लिक है, सब जानती है

गोपीचंद पडळकर यांनी ये पब्लिक है, सब जानती है, या शीर्षकाखाली फेसबुक पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, सोलापूर विद्यापीठाची निर्मिती झाल्यापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवींच नाव विद्यापीठाला देण्यात यावे, अशी मागणी असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवींवर बेगडी, नाटकी प्रेम दाखवणारे आघाडी सरकारचे निर्माते, दिग्दर्शक का गप्प होते ? असा सावाल उपस्थित केला आहे. या पोस्टसोबत पडळकर यांनी रोहित पवार आणि उदय सामंत यांच्या भेटीचा फोटो पोस्ट केला आहे.