भंडार्‍याच्या शासकीय रूग्णालयात मध्यरात्री नेमकं काय घडलं, 10 बालकांचा मृत्यू

भंडारा: येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील (Bhandara Hospital Fire) अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ( SNCU) आग लागल्याने 10 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. दरम्यान या आगीतून सात लोकांना वाचवण्यात यश आले आहे. मृत्युमुखी पडलेली बालकं एक ते तीन महिने या वयोगटातील आहेत. संपूर्ण घटनेची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालय प्रशासनाकडून घेतली असून शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं त्यांनी म्हटल आहे. रुग्णालयात (government hospital) जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. प्रमोद खंडाते दाखल. रुग्णालयाला पोलिसांचा वेढा असून आरोग्य उपसंचालक संजय जयस्वाल नागपूर येथून भंडारा रुग्णालयात पहाटे ५.३५ वाजता दाखल झाले आहेत.

ज्या बालकांचं वजन कमी आहे किंवा प्रकृती नाजूक आहे, अशा बालकांनाच अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ठेवलं जातं. शनिवारी मध्यरात्री लहान बाळांच्या अतिदक्षता विभागात धूर निघत असल्याचं तिथं कामावर असलेल्या नर्सच्या लक्षात आलं. तिनं दार उघडून पाहिलं असता अतिदक्षता विभागात धुराचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळालं. तिने तत्काळ वरिष्ठ डॉक्टरांना याची माहिती दिली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नाने अतिदक्षता विभागातील बाळांना बाहेर काढलं. परंतु, यात 10 बालकांचा मृत्यू झाला.

प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे हि आग लागल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले असून याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी चर्चा करुन अन्य रुग्णांना दुसरीकडे हलवण्याचे आणि लागेल ती मदत पुरवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचं टोपेंनी सांगितले. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून आगीत गुदमरून मृत्यू झालेल्या बालकांचं पोस्ट मार्टेम करणार नसल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे घटनेमागचं कारण शोधून घटनेतील दोषींवर कारवाई करणार असल्याचं आरोग्य राज्यमंत्री येड्रावर यांनी सांगितलं आहे.

आग लागल्याची माहिती समजताच रुग्णालयाबाहेर लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तर आपल्या नवजात बालकांना गमावल्याने आई-वडिलांसह कुटुंबियांनी टाहो फोडला. या आगीच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी हे लोक करत आहेत. तर रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे 10 बालकांचा नाहक बळी गेल्याचा आरोप काहींनी केला आहे.