भारत सरकारचे स्टिकर लावून कोट्यवधींना घातला गंडा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

भारत सरकारमध्ये सचिव पदावर कार्यरत असल्याचे सांगून कोट्यवधींचे कर्ज मिळवून देण्याचा दावा करुन लोकांना गंडा घालणा-या ठकसेनास मुंबई पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. मिलिंद नवाटे असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून खोटी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे.

मिलिंद हा भारत सरकारच्या नावाचे स्टिकर लावलेल्या महागड्या गाड्यांमधून पंचताराकीत हॉटेलमध्ये जात असे.
मिलिंद नवाटे हा आपण भारत सरकारमध्ये सचिव आहोत, असे सांगत असे त्यावर विश्वास बसावा म्ळणून तो लोकांना भेटण्यासाठी मुंबईतील फाइव्ह किंवा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये लोकांना बोलवत असे. तेथे जाण्यासाठी तो महागड्या गाड्यांवर भारत सरकार सचिव असा स्टिकर लावत असे. आपण १० कोटींपासून १०० कोटींपर्यंत कर्ज देऊ शकतो, असा दावा तो करत असे. मात्र ही रक्कम मिळवण्यासाठी प्रथम एक टक्का कमिशन द्यावे लागेल, असे सांगून तो कमिशनची मागणी करत असे.

मिलिंद नवाटे नावाचा ठकसेन अनेक लोकांना गंडा घालत असल्याची खबर वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर अजय सावंत आणि सचिन कदम यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये नवाटे हा रियल इस्टेट एजंट असून त्याच्याविरोधात मुंबई, ठाणे, दिल्ली आणि हरयाणामध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.