मोदी सरकारचा मोठा निर्णय ! जूनपर्यंत गरीबांना मिळणार मोफत धान्य

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मार्च 2020 मध्ये जाहीर केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला आता आणखी 2 महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या योजनेअंतर्गत आता लाभार्थ्यांना मे आणि जून 2021 पर्यंत मोफत अन्नधान्याचा पुरवठा होणार आहे. या योजनेअंतर्गत पाच किलो गहू आणि तांदुळासह 1 किलो चणे दिले जाणार आहेत. या योजनेचा जवळपास 80 कोटी नागरिकांना लाभ होणार आहे. यासाठी केंद्र सरकार 26,000 कोटींहून अधिक रुपये खर्च करणार आहे.

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक राज्यांनी कठोर निर्बंध लागू केले आहेत. अशा या संकटाच्या परिस्थितीत गरीबांना झळ बसू नये यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना आणखी दोन महिने वाढवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून ही प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा राबवण्याची मागणी केली होती. राज्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आणि कोरोनाला अटकाव करण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांसाठी योजना पुन्हा राबवण्याची मागणी भुजबळ यांनी केली होती. अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून दोन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे.