‘लॉकडाऊन’नंतर ‘कोरोना’च्या विरूध्द लढण्यासाठी सरकारनं तयार केला ‘प्लॅन’, आता कमी लोकांमध्ये होणार जास्त ‘काम’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूच्या संसर्गास आळा घालण्यासाठी संपूर्ण देशभरात 3 मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊन संपल्यानंतर देशातील कामकाज कसे चालतील याबाबत सरकारने ब्लू प्रिंट तयार केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लॉकडाऊननंतर कमीत कमी लोकांकडून जास्तीत जास्त काम करणे हे सरकारचे उद्दीष्ट असेल. जेणेकरून देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येईल आणि लोकांनाही कोरोनापासून वाचवता येईल.

योजना तयार केली जात आहे

मात्र, 3 मे नंतर लॉकडाऊन वाढविण्यात येईल की नाही याबाबत सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. परंतु, लॉकडाऊननंतरच्या परिस्थितीची चर्चा सध्या सरकारकडून होत आहे. यापूर्वी केंद्र सरकारने 20 एप्रिलपासून कृषी आणि औद्योगिक क्षेत्रात अनेक सवलती दिल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 मे नंतर आणखी बऱ्याच कामकाजांना सूट मिळू शकते.

कमी लोकांकडून जास्त काम

असे म्हटले जात आहे की सरकार अधिकाधिक ऑफिस कर्मचार्‍यांना घरून काम करण्यास सांगू शकते. याशिवाय कारखान्यांमध्येही काम सुरू होईल. परंतु येथे शिफ्टची वेळ वाढवून सोशल डिस्टेंसिंगवर भर दिला जाईल. यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जातील. या व्यतिरिक्त, लॉकडाऊननंतर कोणत्याही विवाह किंवा धार्मिक घटनेला सूट मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.

पंतप्रधान घेतील अंतिम निर्णय

लॉकडाऊनबाबत पंतप्रधान मोदी अंतिम निर्णय घेतील. तथापि, सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे की 15 मे नंतरच भारतातील कोरोनाचे खरे चित्र स्पष्ट होईल. म्हणजेच संक्रमण कमी होत आहे की वाढत आहे हे जाणून घेणे शक्य होईल. सध्या भारतात 23 हजाराहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत देशभरात 700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.