तोतया पोलीस बनून ग्रामपंचायत सदस्याने केली जबरी चोरी

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस असल्याची बतावणी करुन एका गॅस एजन्सीच्या डिलेव्हरी बॉयला लुटणाऱ्या दोघांना चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी एकजण पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील लासुर्णे ग्रामपंचायतीचा सदस्य आहे. आरोपींना चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील तपास पथकाच्या कर्मचाऱ्यांनी शिवाजीनगर एस.टी. स्टँड परिसरातून सापळा रचून अटक केली. ही घटना १५ ऑक्टोबर रोजी  एपीजे अब्दुल कलाम इन्स्टीट्यूटच्या समोर दुपारी बाराच्या सुमारास घडली होती.

शशिकांत सायबू निंबाळकर (वय-२५ रा. लासुर्णे, ता. इंदापूर), अर्जुन शंकर शिंदे (वय-२५ रा. वडकल, पोस्ट पेण, जि. रायगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी राजाराम बिष्णोई यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीपैकी शशिकांत सायबू निंबाळकर हा लासुर्णे ग्रामपंचायत सदस्य आहे.

फिर्यादी राजाराम बिष्णोई हे भारत गॅसचे सिलेंडर घरपोच करण्याचे काम करतात. १५ ऑक्टोबर रोजी त्यांनी नेहमीप्रमाणे गणेशखिंड येथील गोडावूनमधून गॅस सिलेंडर त्यांच्या पिकअप (एमएच १२ एलटी ३८८१) गाडीत भरुन गॅस सिलेंडर देण्यासाठी गेले होते. दुपारी बाराच्या सुमरास ते एपीजे अब्दुल कलाम इन्स्टीट्यूटच्या समोर आले असता दुचाकीवरुन दोघेजण त्यांच्याजवळ आले. आरोपींनी आमच्या बुकिंगचे काय झाले अशी विचारणा केली. त्यावेळी बिष्णोई यांनी गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन गाडीतून खाली उतरले. आरोपींनी मोबाईलमधील पोलिसांच्या गणवेशातील फोटो त्यांना दाखवून सिलेंडरमध्ये अफरातफर करत असल्याचे सांगून त्यांना मारहाण केली. तसेच पोलीस असल्याचे सांगून पैशांची मागणी केली. आरोपींनी जबरदस्तीने त्यांच्या खिशातील १५ हजार रुपये काढून घेतले. एवढ्यावर आरोपी थांबले नाहीत तर त्यांना गाडीत घालून एटीएम सेंटरमध्ये नेले. त्याठिकाणी त्यांना जीवे मारण्याची धमकी देत एटीएममधून २५ हजार रुपये काढून घेतले. विष्णोई यांनी याची तक्रार चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात देऊन आरोपींचे वर्णन पोलिसांना दिले.
पोलिसांनी आरोपींच्या मोबाईल नंबरवरुन आरोपींचा शोध सुरु केला. दरम्यान, आरोपी शिवाजीनगर एस.टी. स्टँड येथे असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांचे एक पथकाने शिवाजीनगर परिसात सापळा रचून बिष्णोई यांनी दिलेल्या वर्णाच्या आरोपींचा शोध सुरु केला. त्यावेळी दोघेजण पोलिसांना पाहून पळून जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

ही कारवाई परिमंडळ -४ चे पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु, खडकी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) वैशाली गलांडे यांच्या सुचनेनुसार तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संदेस केंजळे, पोलीस उप निरीक्षक प्रेम वाघमोरे, पोलीस नाईक महेश बामगुडे, संतोष जाधव, संजय वाघ, सारस साळवी दादा काळे, तेजस चोपडे यांच्या पथकाने केली.