झोपेत असलेल्या आजी व नातीचा गळा आवळून खून

चंद्रपूर : पोलीसनामा आॅनलाईन
आजी आणि नातीचा गळा आवळून निघृर्ण खून केल्याची घटना शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्डात घडली आहे. सुशीलाबाई कैलास पिंपळकर (५६) असे मृत आजीचे ती श्वेता मुकेश राजपूत (८) असे नातीचे नाव आहे. श्वेता ही सुशीलाबाई यांच्या मुलीची मुलगी आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुशीलाबाई पिंपळकर ह्या त्यांच्या नातीसह राहात होत्या. रात्री दोघीही जेवण करून झोपी गेल्या असता मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपींनी घरात शिरून सुशीलाबाई आणि श्वेताचा गळा आवळून खून केला. सकाळी ९ नऊ वाजता त्यांचे मृतदेह घरातील फरशीवर आढळून आले. शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण करून आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना यश आले नाही. घटनेची माहिती कळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

सुशीलाबाई यांना तीन मुली असून दोघींचे लग्न झाले आहे. दोघीही मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे राहतात. एक मुलगी अविवाहित असून मुलाचे निधन झाले आहे. अविवाहित मुलगी बाहेरगावी असल्याने त्या नातीसह राहात होत्या. विवाहित मुलींपैकी एकीची श्वेता ही मुलगी आहे. आजी आणि नातीच्या या हत्याकांडामागे नेमके कारण काय? याबाबत तपास यंत्रणेला अद्याप काहीच धागेदोरे हाती लागले नाही. या हत्येबाबत शहरात तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यांच्या ओळखीतील किंवा नातेसंबंधातीलच कुणीतरी त्यांचा काटा काढला असावा प्राथमिक संशय व्यक्त होत आहे. या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे. चंद्रपूर शहर पोलिसांनी याप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंदविला आहे.