सोनभद्रच्या ‘हरदी’ डोंगरात 3000 टन सोने आढळल्याचं वृत्त कुठून पसरलं ? वाचा ‘इनसाईड’ स्टोरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये सुमारे तीन हजार टन सोने मिळाल्याचे वृत्त जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया (जीएसआय) ने फेटाळले आहे. एजन्सीने म्हटले आहे की, तीन हजार टन नव्हे, केवळ 160 किलो सरासरी दर्जाचे सोने मिळण्याची शक्यता आहे. जीएसआयने रितसर प्रेस रिलीज काढून ही माहिती दिली आहे. जीएसआयच्या या खुलाशानंतर त्या सर्व वृत्तांना ब्रेक लागला आहे, ज्यामध्ये मागील आठवड्यात सोनभद्रमध्ये मोठ्या प्रमाणात सोने मिळाल्याचा दावा केला जात आहे.

जीएसआयचे संचालक डॉ. जीएस तिवारी यांच्यानुसार, सोनभद्रमध्ये 52806.25 टन कच्चे सोने आहे, हे शुद्ध सोने नाही. सोनभद्रमध्ये सापडलेल्या कच्च्या सोन्यातून प्रति टन केवळ 3.03 ग्रॅम सोनेच मिळेल. या हिशेबाने संपूर्ण खाणीतून केवळ 160 किलो सोने मिळू शकते. मग मोठा प्रश्न असा आहे की, सोनभद्रमध्ये तीन हजार टन सोने सापडल्याचे वृत्त कुठून पसरले ? याचा शोध घेतला असता समजले की, हा सर्व खेळ उत्तर प्रदेशचा खनिज विभाग आणि सोनभद्रचे कलेक्टर यांच्यात झालेला पत्रव्यवहार लीक झाल्यानंतर सुरू झाला आहे.

एका वृत्तसंस्थेनुसार, उत्तर प्रदेशच्या भूगर्भ आणि खनिज संचालनालयाने (मायनिंग डायरेक्टरेट) 31 जानेवारी 2020 ला लिहिलेल्या आपल्या पत्रात म्हटले की, सोनभद्र जिल्ह्याच्या सोना पहाडीत एकुण 2943.26 टन आणि हरदी खाणीत 646.15 किलोग्रॅम सोने असण्याची शक्यता आहे. पत्रात सोनभद्रच्या जिल्हाधिकार्‍यांकडून या संबंधी 20 जानेवारीला पत्र व्यवहार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. अशा प्रकारे हे पत्र सांगते की सोनभद्र जिल्ह्याच्या दोन भागात सुमारे तीन हजार टन सोने असण्याची शक्यता आहे.

या पत्रात म्हटले आहे की, जीएसआय उत्तर क्षेत्र लखनऊ यांच्याकडून खनिजाच्या लिलावाचा अहवाल उपलब्ध करून देण्यात आला आहे. खनिज खाणीच्या लिलावापूर्वी भू तपासणी केली जाणार आहे. सोने काढण्यासाठी या पत्रात सात सदस्यांची समिती गठीत करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली आहे.

जेव्हा 31 जानेवारीचे हे पत्र मागील 19 फेब्रुवारीला सोनभद्रच्या स्थानिक मीडियाच्या हाती लागले, तेव्हा ही बातमी आगीसारखी पसरली. जिल्ह्यात तीन हजार टन सोने मिळाल्याच्या वृत्तानंतर टिव्ही चॅनल्सने असे वातावरण तयार केले की भारतात पुन्हा सोन्याचा धूर निघणार आहे.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य सुद्धा हा देवाचा आशीर्वाद असल्याचे सांगू लागले. या प्रकरणाची जेव्हा अति चर्चा होऊ लागली तेव्हा शनिवारी जीएसआयच्या कोलकाता येथील मुख्यालयाला प्रेसनोट जारी करून खुलासा करावा लागला. संस्थेने म्हटले की, सोनभद्रमध्ये तीन हजार टन सोने मिळाल्याचे वृत्त चुकीचे आहे.