‘करोना’च्या संकटातच पेट्रोलपासून मोबाइलपर्यंत महागाईचा ‘भडका’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरातील अर्थव्यवस्था कोरोना व्हायरसमुळे अडचणीत आली आहे. या तर, भारतात सर्वसामान्यांना कोरोनासह महागाईची देखील झळ बसत आहे. शनिवारी काही अशा घोषणा झाल्या ज्यानंतर मोबाईल फोनपासून पेट्रोल-डिझेलपर्यंत अनेक गोष्टी महाग होणार असल्याचे स्पष्ट झाले. जाणून घेवूया याबाबत…

येत्या काळत मोबाइल फोन महाग होणार आहेत. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत मोबाइल फोन 18 टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. यापूर्वी हे प्रॉडक्ट 12 टक्केच्या स्लॅबमध्ये होते.

यामुळे मोबाइल फोनवरील टॅक्समध्ये 6 टक्के वाढ झाली आहे. यामुळे मोबाइल फोन खरेदी करणे महागडे ठरणार आहे. हे नवे दर 1 एप्रिल 2020 पासून लागू होतील.

हा सर्वसामान्य लोकांसाठी झटका आहे. कोरोना व्हायरसमुळे अगोदरच याची किमत वाढण्याची शक्यता आहे. चीनमधून पुरवठा कमी होत असल्याने मोबाइल फोन महाग होत आहेत.

याशिवाय सरकारने पेट्रोल, डिझेलवर उत्पादन शुल्कात प्रति लीटर तीन रुपयांची वाढ केली आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसर पेट्रोलवर विशेष उत्पादन शुल्क 2 रुपये वाढवून 8 रुपये प्रति लीटर केले आहे.

डिझेलवर हे शुल्क दोन रुपये वाढवून आता चार रुपये प्रति लीटर झाले आहे. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलवर लागणारा रोड सेस सुद्धा एक-एक रुपया प्रति लीटर वाढवून 10 रुपये प्रति लीटर करण्यात आला आहे.

या वाढीनंतर पेट्रोलवर आता सेस सह सर्व प्रकारचे उत्पादन शुल्क 22.98 रुपये प्रति लीटर आणि डिझेलवर 18.83 रुपये प्रति लीटर झाले आहे.

आता माचिसवर 12 टक्के जीएसटी लागणार आहे. यापूर्वी हाताने तयार केलेल्या माचिसवर 5 टक्के आणि मशिनवर तयार केलेल्या माचिसवर 18 टक्के टॅक्स लागत होता. त्यामुळे हाताने तयार माचिस तयार करणार्‍यांना व ती खरेदी करणार्‍या ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे.