‘एम्पायर इस्टेट’ पुलाचे पालकमंत्री गिरीष बापटांच्या हस्ते उद्या लोकार्पण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन

महापालिकेतर्फे चिंचवड येथील एम्पायर इस्टेट पुलाचे काम पुर्ण झाले असून उद्या (सोमवारी दि.14) सायंकाळी 5.30 वाजता काळेवाडीफाटा ते देहू-आळंदी रस्ता या बीआरटीएस रस्त्यावरील पवना नदी, पूणे – मुंबई लोहमार्ग व महामार्ग यांना आेलांडून आॅटोक्लस्टर येथे उतणारा समांतर 1600 मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे लोकार्पण व उद्घाटन पालकमंत्री गिरीष बापट यांचे हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर हा पुल वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.

या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महापाैर नितीन काळजे, खासदार अमर साबळे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक उपसि्थत राहणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने जवाहरलाल नेहरु नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत (जेएनएनयूआरएम) 11 किलोमीटर लांबीच्या काळेवाडीफाटा ते देहू-आळंदी (219.20) या बीआरटी प्रकल्पाअंतर्गत सुमारे 1600 मीटर लांबीच्या चिंचवड-एम्पायर इस्टेट येथील उड्डाणपुल उभारण्याचा निर्णय घेतला. या पुलाला 2010 मध्ये मान्यता मिळाली. त्यासाठी सन 2011 मध्ये निविदा प्रसिद्ध करण्यात आली. प्रत्यक्षात 6 एप्रिल 2011 ला पुलाच्या कामाला सुरुवात झाली. गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे पुलाचे काम रखडले होते. तब्बल आठ वर्षांनी आता पुलाचे काम पुर्ण झाले आहे.

बीआरटीएसच्या कामातील पवना नदी, मुंबई-पुणे रेल्वे आणि पुणे-मुंबई महामार्ग ओलांडणारा उड्डाणपूल एम्पायर इस्टेट येथे बांधण्यात आला आहे. तो १.६० किलोमीटर लांबीचा आणि नदी, महामार्ग अडथळे ओलांडून जाणारा आहे. त्याची रुंदी २३ ते ३० मीटर आहे. या मार्गाच्या आखणीत स्वतंत्र बीआरटी लेन आणि इतर वाहनांसाठी ५.५ ते ७ मीटर रुंदीच्या स्वतंत्र मार्गाचा समावेश आहे. पादचाऱ्यांसाठी पवना नदी व रेल्वेवरील पुलावर स्वतंत्र दोन मीटरचा मार्ग तसेच चारही बाजूंनी चढण्या-उतरण्यासाठी जिन्यांची सोय करण्यात आली आहे. उड्डाणपुलामध्ये १.८ मीटर रुंदीचा पादचारी आणि सायकलसाठी स्वतंत्र मार्ग राखीव आहे. पादचारी व सायकलवरून जाणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी या मार्गाच्या दोन्ही बाजूस काँक्रीटचे अंटिक क्रॅशन रेलिंग आहे. हा उड्डाणपूल निवासी भागातून येत असल्याने तेथील रहिवाशांचा विचार करून ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी नॉईज बॅरिअर्सचा समावेश करण्यात आला आहे.

येत्या सोमवारीपासून हा पुल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. तसेच या पुलाचे संत मदर तेरेसा असे नामकरण केले जाणार आहे. हा पूल नवीन असल्याने नागरिकांनी वाहने सावकाश चालवावित असे आवाहन, महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.