महिला बँक मॅनेजर खून प्रकरणात 12 तासात आरोपींना अटक, खूनाचे कारण उघड

गुहागर : पोलीसनामा ऑनलाइन – गुहागर तालुक्यातील वेलदूर येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा वेलदूरच्या महिला मॅनेजरचा मृतदेह गुरुवारी दाभोळ खाडीत सापडला होता. सुनेत्रा दुर्गुळे असे या महिला बँक मॅनेजरचे नाव असून त्या चिपळून येथील रहिवासी आहेत. गुरुवारी सकाळी दाभोळ खाडीतील नवानगर परिसरात त्यांचा मृतदेह खाडीत तरंगत असताना दिसला होता. गुहागर पोलिसांचा या खुनाचा यशस्वी तपास केला असून नवानगर गावातील दोन आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. यामुळे या खूनाचे गुढ उकलले आहे.

संजय श्रीधर फुणगुसकर (वय-40) आणि सत्यजित बबन पटेकर (वय-32 दोघे रा. नवानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास अटक करण्यात आली. आज (शुक्रवार) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने संजय फुणगुसकरला 25 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर दुसऱ्या आरोपीची आरोग्य तपासणी करण्यास सांगितले आहे.

असा केला तपास
पोलिसांनी सांगितले की, सुनेत्रा यांच्या मोबाइल सीडीआरचे विश्लेषण करण्यात आले. नातेवाईकांकडून माहिती घेण्यात आली. त्यावरुन सुनेत्रा यांनी संजय फुणगुसकर यांच्या सोबत वेलदूर ते शृंगारतळी असा प्रवास केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संजय फुणगुसकर यांच्या मोबाईल सीडीआरचेही विश्लेषण करण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात झाली त्यावेळी पोलिसांनी संकलीत केलेली माहिती आणि संजय फुणगुसकर सांगत असलेल्या गोष्टींमध्ये तफावत आढळून आली. अखेर पोलिसी खाक्या दाखवल्यावर आरोपी संजय फुणगुसकर याने सत्यजित पटेकर याच्या मदतीने पैशांसाठी सुनेत्रा यांचा खून केल्याचे सांगितले.

कसा आखला खुनाचा कट ?
आरोपी संजय फुणगुसकर हा विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा वेलदूरमध्ये सराफाचे काम करत होता. सुनेत्रा यांनी सोन्याच्या व्यवहारासाठी सात लाख रुपये आणले होते. या पैशांच्या हव्यासापोटी संजय आणि सत्यजित यांनी सुनेत्रा यांचा गळा आवळून खून केला. त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह वेलदूर नवानगर तरी जेट्टी येथे आणून मृतदेहाच्या पायाला व कमरेला रस्सी बांधून त्याला दोन मोठे दगड बांधून जेट्टीसमोर दाभोळ खाडीत ढकलून दिले. या गुन्ह्यात अवघ्या चार तासांत पोलीस संशयितांपर्यंत पोचले. चौकशी करुन 12 तासाच्या आत आरोपींना अटक केली.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरणकुमार कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.के. जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंदराव पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू कांबळे, सचिन पाटील, सचिन चव्हाण, संतोष साळसकर, संतोष माने, वैभव चौगुले, हेमलता कदम, आदीनाथ आदवडे, सुभाष भागणे, शांताराम झोरे, राकेश बागुल, अरुण चाळके, गुरु महाडिक, रमीझ शेख, मिलींद चव्हाण, इम्रान शेख यांच्या पथकाने केली.