2006 मधील बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला 14 वर्षानंतर पुण्यातून अटक, एटीएसची कारवाई

अहमदाबाद : वृत्तसंस्था – 2006 मध्ये गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यातील काळूपूर रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट झाला होता. या गुन्ह्यातील एका आरोपीला गुजरात दहशदवाद विरोधी पथकाने (ATS) महाराष्ट्रातील पुण्यातून अटक केली आहे. मोहसीन असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या संदर्भात एका वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

अहमदाबाद जिल्ह्यातील काळूपूर रेल्वे स्थानकावर 19 फेब्रुवारी 2006 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. काळूपूर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 2 आणि 3 च्या मध्ये बॉम्ब ठेवण्यात आले होते. या बॉम्बस्फोटात अनेक लोक गंभीर जखमी झाले होते. मात्र, जिवीत हानी झाली नव्हती. या प्रकरणाचा तपास गुजरात एटीएस करत असून आतापर्यंत या गुन्ह्यात अनेकांना विविध ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे.

काळूपूर रेल्वे स्थानकावर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी पुण्यात असल्याची माहिती गुजरात एटीएसला मिळाली होती. त्यानुसार गुजरात एटीएसने या प्रकरणात 15 वर्षे फरार असलेल्या मोहसीन नावाच्या आरोपीला पुण्यातून अटक केली आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील औरंगाबाद, बीड येथून आरोपींना अटक करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.