Pune News : पिरंगुटमध्ये अडीच लाखचा गुटखा जप्त, कार चालकासह 1 मुलगा ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या कारवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी अडीच लाख रुपये किमतीचा गुटखा व ओमनी कार असा एकूण साडेतीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी कार चालक आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पौड पोलिस स्टेशन आणि पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्तपणे केली.

या प्रकरणी कार चालक रामलाल छौगाजी चौधरी (वय-43 रा. पिरंगुट कॅम्प) याला अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिरंगुट घाटामध्ये पेट्रोलिंग करत असताना पुण्याच्या दिशेने एक मारुती ओमनी (एमएच12 एचएन 3028) ही भरधाव वेगात संशयितरित्या जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी ओमनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र चालक कार न थांबवता भरधाव वेगात निघून गेला. पोलिसांनी कारचा पाठलाग करुन पिरंगुट गावातील बसस्थानक परिसरात अडवली. कारची पाहणी केली असता कारमध्ये विमल पान मसाला नावाची सुगंधी तंबाखू व गुटखा मिक्सची 8 पोती मिळाली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक विनायक देवकर, पोलीस उपनिरीक्षक धोंडगे, सहायक फौजदार दत्ता जगताप, राजेंद्र पुणेकर, नितीन रावते, चंद्रशेखर हगवणे, विनायक भोईटे यांच्या पथकाने केली.