हज यात्रेकरुंची फसवणूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स एजंटला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन-हज यात्रेला जाण्यासाठी लागणाऱ्या तिकीटासाठी बुकींगचे पैसे देऊन देखील तिकीट न देणाऱ्या ट्रॅव्हल्स एजंटला अटक करण्यात आली आहे. ट्रॅव्हल्स एजंटला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीने आत्तापर्यंत २२ जणांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. सरफराज जैनुदिन जिवरत असे अटक करण्यात आलेल्या ट्रॅव्हल्स एजंटचे नाव आहे.

मुंब्रा येथील रहिवासी चौगले मोहम्मद हुसेन यांनी आॅक्टोबरमध्येच सरफराजकडे हज यात्रेसाठी ६ तिकिटांची बुकींग केली. त्यासाठी त्यांनी २ लाख ८८ हजार रुपये दिले.  ठरल्याप्रमाणे रविवारी ते निघाले. मात्र त्याच दिवशी  सरफराजने यात्रेकरुंना व्हिसा दिला नाही. उडवाउडवीचे उत्तरे देत सरफराजने त्यांना टाळले. यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आझाद मैदान पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरु केला. या प्रकरणात  सरफराजला अटक केली.

पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने आतापर्यंत २२ जणांची फसवणूक केल्याची कबुली दिली आहे. काहींना पासपोर्ट परत केल्याची माहिती त्याने दिली. तर काहींना बनावट तिकीट दिल्याचीही कबुली दिली आहे.