विराटचं पहिलं प्रेम ‘करिष्मा’, जाणून घ्या किंग कोहलीबद्दलच्या 10 गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आज ३२ वर्षांचा झाला. दोन ते अडीच वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाची धुरा आपल्या खांद्यावर आल्यानंतर विराटच्या फलंदाजीमध्ये आणि क्रिकेकडे पाहण्याच्या दृष्टीकोनामध्ये मोठा बदल झाल्याचे पहायला मिळालं आहे. विराटची लोकप्रियताही प्रचंड आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी…

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्याशी विराटने विवाह केला आहे. मात्र एका कार्यक्रमात बोलत असताना विराटने करिष्मा कपूर ही अभिनेत्री आपलं पहिलं प्रेम असल्याचं मान्यं केलं होतं.

वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर जमा आहे. २०१३ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध जयपूर येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात विराटने ५२ चेंडूंमध्ये १०० धावा केल्या होत्या. याआधी हा विक्रम विरेंद्र सेहवागच्या नावे जमा होता, सेहवागने ६० चेंडूत शतक झळकावलं होतं. विराटच्या या शतकी खेळीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाने दिलेलं ३६० धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं होतं.

कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरही विराटची फलंदाजी ही नेहमी बहरलेलीच राहिली आहे. कर्णधार या नात्याने तीन डावांत तीन शतकं झळकावण्याचा अनोखा विक्रम विराट कोहलीच्या नावावर जमा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत असताना विराटने सलग तीन डावांमध्ये ११५, १४१, १४७ अशी शतकी खेळी साकारली होती.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांमधली रंगत सर्वांनाच माहिती आहे. याच पारंपरिक प्रतिस्पर्ध्याविरुद्ध विराट कोहलीने वन-डे क्रिकेटमधली सर्वोत्तम धावसंख्या नोंदली आहे. ढाक्यामध्ये झालेल्या सामन्यात विराटने १८३ धावांची खेळी केली होती.

विश्वचषकात भारताचं प्रतिनिधीत्व करणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. विराटनेही २०११ च्या विश्वचषकात भारताचं प्रतिनिधीत्व केलं, यादरम्यान विराटने एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात शतक झळकावणारा तो एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे. विराटने या सामन्यात नाबाद १०० धावांची खेळी केली होती.

क्रिकेटमध्ये दोन दिग्गज खेळाडूंच्या तुलना होणं ही गोष्ट आता काही नवीन नाहीत. सचिन तेंडुलकर आणि सर डॉन ब्रॅडमन यांची तुलना आपल्याला सर्वांनाच माहिती असेल. मात्र वेस्ट इंडिजचे माजी फलंदाज सर व्हिवीअन रिचर्ड यांनीही एकदा, विराटच्या खेळीत मला स्वतःचा भास होतो असं वक्तव्य केलं होतं. कोहलीच्या आक्रमक खेळाला रिचर्ड यांनी दिलेली ही सर्वोत्तम पावती होती.

दिल्लीच्या स्थानिक क्रिकेटमध्ये विराट कोहलीला चिकू या नावाने ओळखलं जायचं. विराटचे प्रशिक्षक अजित चौधरी यांनी कोहलीला हे नाव दिलं होतं. मात्र यानंतर विराटने आपल्या खेळीने सर्वांना थक्क करत भारतीय संघात स्थान मिळवलं, यानंतर आज तो भारतीय संघाच्या यशस्वी कर्णधारापैकी एक म्हणून गणला जातो.

क्रिकेटसोबत विराट कोहली आपले लुक्स, ड्रेसिंग स्टाईल यासाठीही ओळखला जातो. २०१२ साली जाहीर करण्यात आलेल्या ‘Well Dress International Man’ च्या यादीत विराटला सर्वोत्तम १० जणांमध्ये स्थान मिळालं होतं. अमेरिकेची माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही या यादीत स्थान मिळालं होतं.

क्रिकेट सोबतच विराट अनेक उत्पादनांच्या जाहीरातीही करतो. २०१५ साली ब्रिटीश मासिक Sports Polo ने विराटला Most Marketable Player या यादीतमध्ये सहाव्या क्रमांकाचं स्थान दिलं होतं.