‘भज्जी’चा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाला पाठिंबा, नागरिकांना केलं ‘हे’ आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले असता, मात्र काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्रात ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन लागू केला आहे. याबाबत नियमावली जाहीर करण्यात आलीय.

राज्यात लागू केलेल्या निर्णयावरून इंडियन क्रिकेट टीमचा माजी फिरकीपट्टू हरभजन सिंग याने रोखठोक भूमिका घेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. तर हरभजन सिंग म्हणाला, लोक जर सांगूनही ऐकत नसतील तर लॉकडाऊन कराच. लोक केव्हा गांभीर्यानं मुद्दा समजून घेणार आहेत आणि कसा तेच कळत नाही, असा संताप हरभजन सिंगने व्यक्त केला होता.

देशाच्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात आहे. यावरून मुख्यमंत्री ठाकरेंनी फेसबुक लाईव्हद्वारे सातत्याने राज्यात कडक निर्बंध लावण्याचे संकेत दिले होते. तर महाराष्ट्रात आता कडक निर्बंध लागू करण्यात आले असून नागरिकांनी नवीन नियमावली पाळावी, असे आवाहन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन केले आहे. तर आदित्य ठाकरेंनी ब्रेक द चेनची निमयावली पाळून सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना केलं आहे. या ट्विटवरून हरभजन सिंगने रिट्विट करत मुख्यमंत्री ठाकरे आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाला पूर्णपणे पाठींबा दिला आहे. तसेच हरभजनने ट्विटद्वारे म्हटले की, देशात दररोज १ लाख रुग्ण आढळून येत आहेत. सर्वांच्या आरोग्यासाठी आपण प्रार्थना करुया, सर्वांनी सुरक्षित राहावे हीच विनंती, असे भज्जीने म्हटलं आहे.