बंजारा समाजाच्या ‘या’ नेत्याने थेट मुख्यमंत्र्यांना लिहले पत्र, म्हणाले – ‘तुमच्यासाठी आमदारकी पणाला लावली, आता मला वनमंत्री करा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान आता बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मलाच आता वनमंत्री करा, अशी मागणी केली आहे तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी मी स्वत:ची आमदारकी पणाला लावली. शिवसेनेला बंजारा समाजाची गरज आहे. त्यामुळे मला वनमंत्री करा, असे राठोड यांनी पत्रात म्हटले आहे.

याबाबत हरीभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, आता वनमंत्रीपद मला द्यावे. अन्यथा मला काँग्रेसच्या कोट्यातून सहज मंत्रिपद मिळाले असते. या पत्रानंतर आता मुख्यमंत्री ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतरच महाविकास आघाडीत वनमंत्रिपद मिळवण्यासाठी चाचपणी सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या मंत्रिपदाचा तात्पुरता कारभार मुख्यमंत्री ठाकरे ठरवतील त्याच मंत्र्याकडे जाईल, असे सांगितले जात आहे. दरम्यान वनमंत्रीपदासाठी संजय रायमुलकर, गोपीकिशन बाजोरिया हे विदर्भातील शिवसेनेचे आमदार प्रयत्न करत असल्याचे समजते. तर, मुंबई-ठाण्यातील आमदारही वनमंत्रीपद मिळेल का, याची चाचपणी करत असल्याचे समजते. मात्र, यामध्ये आमदार रवींद्र वायकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.