हडपसरमध्ये किराणा दुकानदाराला खंडणी मागत मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दरमहा पन्नास हजार रुपयांची खंडणी मागत नकार दिल्यावर किरणा दुकानदाराला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार फुरसुंगी येथील मंतरवाडी फाट्याजवळ शनिवारी सायंकाळी घडला. याप्रकरणी दोघांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश मोडक (२२), मयुर मोडक (२५, वडकीगाव) अशी गुन्हा दाखल कऱण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर याप्रकरणी एका ४३ वर्षीय किराणा दुकानदाराने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे फुरसुंगी येथे किराणा मालाचे दुकान आहे. ते दुकानात असताना त्यांच्याच परिसरातील गणेश मोडक व मयुर मोडक या दोघांनी त्यांना जवळ बोलवून शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना किराणा दुकान चालवायचे असेल तर पन्नास हजार रुपये दर महिन्याला द्यावे लागतील अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यावर त्यांना धारदार शस्त्र उलटे करून बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.