डॉक्टर सुनेचा २ कोटीसाठी छळ ; डॉक्टर पती, नि. पोलीस अधिक्षक सासऱ्यासह कुटुंबियांवर गुन्हा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – डॉक्टर सुनेचा माहेरहून २ कोटी रुपये आणण्यासाठी छळ करत तिला दोन वेळा मनाविरुद्ध गोळ्या देऊन गर्भपात केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विवाहितेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, डॉक्टर पती, सेवानिवृत्त पोलीस अधिक्षक सासरा, सासू, नणंद, दीर यांच्याविरोधात पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. महेश हरिलाल जाधव, हरिलाल रामसिंग जाधव, दिनेश हरीलाल जाधव (सर्व रा. पारिजातनगर, एन चार, प्लॉट क्रमांक ४८), सासू आणि दोन नणंदांविरुद्ध हुंड्यासाठी छळ करणे, मनाविरुद्ध गर्भपात करणे, मारहाण करणे, धमक्या देणे; तसेच कौटुंबीक हिंसाचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत डॉक्टर महिला ही नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील आहे. तिचा विवाह डॉ. महेश हिरालाल जाधव याच्याशी १८ मे २०१७ रोजी झाला होता. लग्नानंतर एक महिन्यानंतर सासरच्या मंडळीकडून तिचा छळ सुरु झाला. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत तिचा मोबाईल काढून घेण्यात आला. त्यानंतर तिला माहेरच्या मंडळीशी देखील संपर्क करु दिला जात नव्हता. त्यानंतर तिच्या आई वडीलांनी समजूत काढल्यावर काही दिवस असा प्रकार घडला नाही. परंतु दोन वेळा गर्भवती राहिल्यानंतर तिच्या मनाविरुद्ध गोळ्या देऊन मनाविरुद्ध तिचा गर्भपात करण्यात आला. त्यानंतर तिची तब्येत बरी नसताना तिला माहेरी पाठविले आणि ती परत आल्यनंतर तिच्याकडे नवीन हॉस्पीटल सुरु करण्यासाठी व स्कोडा कार घेण्यासाठी २ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. त्यासोबतच पैसे नाही आणल्यास घरात घेणार नसल्याची धमकी दिली. अशे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर महिलेने अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दाद मागितली. त्यानंतर तिच्या तक्रारीची दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.