राहुल गांधींना पंजाब सांभाळता येत नाही, देश काय सांभाळणार ? : केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर

औरंगाबाद : पोलीसनामा आॅनलाइन – पंजाब हे पाकिस्तानच्या जवळ असलेले राज्य आहे. येथे काश्मीरसारखी स्थिती निर्माण व्हावी म्हणून पाकचे नेहमीच प्रयत्न सुरू असतात. आधीच्या सरकारने ही परिस्थिती नियंत्रणात आणली होती. परंतु, काँग्रेसच्या काळात ती हाताबाहेर गेली. पंजाबच्या दहशतवादाला काँग्रेसच जबाबदार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना पंजाब राज्य सांभाळता येत नाही, ते देश काय सांभाळणार, असा टोला केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल यांनी लगावला. पैठण रस्त्यावरील धनगाव येथे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या फूड पार्क योजनेअंतर्गत निर्मित पैठण मेगा फूड पार्कच्या उद्घाटन सोहळ्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

सर्व मागण्या मान्य होईपर्यंत मराठा उपोषण सुरूच राहणार 

कौर म्हणाल्या, पंजाब राज्यात दहशतवाद पुन्हा एकदा फोफावतोय आणि त्याला परकीय साथ आहे. या परिस्थितीला तेथील विद्यमान काँग्रेस सरकार जबाबदार आहे. पंजाबमध्ये वर्षभरात ६०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. तब्बल ४०० तरुणांचा मृत्यू ड्रग्जच्या अतिसेवनाने झाला आहे. पंजाबची परिस्थिती बिघडत आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी परकीय शक्ती सरसावल्या आहेत. ड्रग्जच्या माध्यमातून युवकांना नशेच्या गर्तेत ढकलण्यात येत आहे. काँग्रेसच्या काळामध्ये हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीचा फायदा कट्टरतावादी घेत आहेत. पंजाबमध्ये दहशतवाद माजविण्यासाठी परकीय साथ मिळत आहे.

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, संत एकनाथ, पैठणीमुळे पैठणचे नावलौकिक आहे. परंतु या फूड पार्कमुळे पैठणची नवीन ओळख निर्माण होईल. महाराष्ट्र शासनाकडून उद्योग क्षेत्राला चालना देण्यात येत आहे. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. म्हणूनच अमरावतीनंतर मराठवाड्यात लवकरच टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार आहे. तसेच डीएमआयसीतील संरक्षण साधने उत्पादन क्षेत्र, मिनी फूड पार्कमधील गुंतवणुकीतून मराठवाड्याचा विकास साधणार आहोत.