चंद्रकांत पाटील देशाचे पंतप्रधान आहेत, की कृषिमंत्री ? : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कृषी कायदा बदलणार नाही, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. यावरून राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे देशाचे पंतप्रधान (PM) आहेत की, कृषिमंत्री ? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच ते मुद्दाम आगीत तेल ओतत असल्याचा आरोपदेखील मुश्रीफ यांनी केला आहे, तर दुसरीकडे कृषी कायदा रद्द करण्यास विरोध करून भाजप हा शेतकरी हिताविरुद्ध आहे हे चंद्रकांत पाटील यांनी सिद्ध केले आहे, असा टोला गृह राज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी लगावला आहे.

भाजप सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकास विरोध करण्यासाठी आणि दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच राज्यातील जनतेने अत्यावश्यक सेवा वगळून कडकडीत बंद पाळावा. हा बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन मुश्रीफ यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

घरासमोर काळा झेंडा लावा – सतेज पाटील

पालकमंत्री व गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी म्हटले की, या बंदला पाठिंबा देण्यासाठी सर्वांनी उद्या आपल्या घरासमोर काळा झेंडा लावा. माझा काय संबंध असे न म्हणता प्रत्येकाने बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहेत.

शेतकरी पायातील काढून सांगतील

सतेज पाटील पुढे म्हणाले, हा कायदा बदलणार नाही अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे. याचा अर्थ भाजप शेतकऱ्यांच्या विरोधात आहे हे स्पष्ट होते. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना हा कायदा बदलणार नाही असे सांगावे. मग शेतकरी पायातील काढून त्यांना हा कायदा कसा चुकीचा आहे हे त्यांना समजाऊन सांगतील, असाही टोला पाटील यांनी लगावला आहे.