Hassan Mushrif : ‘भाजपला परमबीर सिंग यांना माफीचा साक्षीदार बनवायचंय’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सचिन वाझे प्रकरणावर भाष्यं केले आहे. मुश्रीफ म्हणाले की, पोलिस दलातील सचिन वाझे सारख्या साध्या फौजदारपदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचे कारनामे उघडकीस आले म्हणजे लगेच सरकार अडचणीत आले असे होत नाही. वाझेंना महागड्या गाड्या घ्या, ऐशोआराम करा, असे सरकारने थोडेच सांगितले? एखाद्या डॅशिंग अधिकाऱ्याला शबासकी देणे म्हणजे त्याला गैरकृत्य करण्यास सूट देणे असे होत नाही, असे ते म्हणाले. तसेच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना भाजप माफीचा साक्षिदार बनवून पहात आहे, असा आरोप मुश्रीफ यांनी आज पुन्हा एकदा केला आहे.

पोलिस अधिकाऱ्यांना वर्दीचा अभिमान असावा, वर्दीचा उपयोग समाजासाठी करता आला पाहिजे. त्या आडून गैरकृत्य करता कामा नये. मात्र, याचाच सचिन वाझेंना विसर पडल्याचे दिसते. आता या प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेला आहे तर आमचीही इच्छा आहे या की याचा लवकरात लवकर तपास लागावा. ती स्फोटके कोणी ठेवली, कशासाठी ठेवली, याचा मास्टरमाइंड कोण हे सत्य बाहेर आले पाहिजे, असे मुश्रीफ यावेळी म्हणाले.

मुश्रीफ म्हणाले की, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण आणि टीआरपी घोटाळा प्रकरण याचा तपास परमवीर सिंग यांनी उत्साहाने केला. त्यात अर्णव गोस्वामी आडचणीत आले. त्यावेळी सिंग भाजपच्या रडावर होते. त्यानंतर वाझे प्रकरण घडले. त्याचे धागेदोरे थेट सिंग यांच्यापर्यंत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले. तेथे त्यांनी भेटीगाठी घेतल्या आणि नंतर सिंगांचे ते पत्र समोर आले. हा घटनाक्रम पाहिला तर भाजप त्यांना माफीचा साक्षिदार करून यातून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते. रश्मी शुक्ला यांचे फोन टॅपिंग आणि अपक्ष आमदारांना भाजपमध्ये येण्यास सांगणे हा प्रकार देखील गंभीर आहे. त्यामुळे या सर्वांचा लवकरात लवकर छडा लागावा, असे ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारबद्दल बोलताना मुश्रीफ म्हणाले, आमची आघाडी आणि सरकार भक्कम आहे. पुढील 20 ते 25 वर्षे तरी धोका नसल्याचे ते म्हणाले.