‘त्या’ प्रकरणी यू-ट्यूब, गुगल, ट्विटरला हायकोर्टाची नोटीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आचारसंहितेच्या काळात विविध राजकीय पक्ष फेसबुक, यू-टय़ूब, ट्विटरसारख्या सोशल मीडियावर जाहिरातबाजी तसेच पक्षाच्या प्रचाराबाबत पोस्ट अपलोड करतात. त्यावर बंदी घालावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका ऍड. सागर सुर्यवंशी यांनी हायकोर्टात दाखल केली आहे. या प्रकरणी हायकोर्टाने गुगल, ट्विटर आणि यू-टय़ूबला नोटीस बजावली आहे.

राजकीय प्रचारासाठी सोशल मीडिया हे एक प्रभावशाली माध्यम बनले आहे. सोशल मीडियावरील पेड राजकीय जाहिरातींच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करू नका. याकडे गांभीर्याने पाहा, असा सावधानतेचा इशारा हायकोर्टाने निवडणूक आयोगाला  दिला आहे. सोशल मीडियावरील पेड राजकीय जाहिरातींवर कसे नियंत्रण आणता येईल, याबाबत हायकोर्टाने निवडणूक आयोग व फेसबुकला ४ फेब्रुवारीपर्यत सूचना करण्यास सांगितले होते.

आचारसंहिता काळात सोशल मीडियावर राजकीय पक्ष जाहिरातबाजी करतात. या माध्यमांमध्ये फेसबुकचाही समावेश आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने तक्रार केल्यास अथवा त्यासंदर्भात अधिसूचना काढल्यास एफबीवरून राजकीय पक्षांबाबत जाहिरातबाजी करणारा आक्षेपार्ह मजकूर हटवला जाईल, अशी माहिती फेसबुकच्या वतीने आज हायकोर्टात देण्यात आली.