सुरेश रैनाच्या चैन्नई सुपर किंग्समधील भवितव्याबाबत फ्रँचायझीनं दिले स्पष्ट संकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन प्रीमिअर लीगच्या १३ व्या पर्वात संयुक्त अरब अमिरातीत दाखल झाल्यापासून चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) संघासोबत बऱ्याच नाट्यमय घटना घडल्या. दीपक चहर व ऋतुराज गायकवाड यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील १३ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह सापडले, त्यानंतर सुरेश रैना आणि हरभजन सिंग या दोन खेळाडूंनी वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली. कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यासोबतचा वाद रैनाच्या माघार घेण्यामागे कारणीभूत असल्याची चर्चा रंगली. त्यात CSK नं त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून रैनाचे नावच काढून टाकल्यानंतर चर्चा अधिक तीव्र झाल्या. त्यामुळे रैनाची CSK मधील इनिंग संपली अशी चर्चा असताना पुढील मोसमात तो आमच्यासोबत असेल. त्याला संघापासून दूर करण्याचा कोणताही प्लान नाही असं स्पष्ट संकेत CSK च्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्याने दिले आहे.

सुरेश रैनासाठी २०२० हे वर्ष फार चांगले गेले नाही. त्यानं १५ ऑगस्टला महेंद्रसिंग धोनीपाठोपाठ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यात त्याच्या काकांवर दरेडोखोरांनी भ्याड हल्ला केला आणि त्यात काकांना प्राण गमवावे लागले. आत्याही त्यात गंभीर जखमी झाली आहे. पण, वर्षाअखेरीस रैनाला CSK कडून एक गुड न्यूज मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फ्रँचायझींनी रैनाला इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वात संघात पाहयला आवडेल, असे संकेत दिले. एका इंग्रजीची वृत्तपत्राशी बोलताना CSK च्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यानं संगितले की, पुढील मोसमात तो आमच्यासोबत असेल. त्याला संघापासून दूर करण्याचा कोणताही प्लान नाही.

कोरोना नियमांचे उल्लंघन करून पार्टी करणाऱ्या ३४ सेलिब्रेटिंना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यात सुरेश रैनाचाही सहभाग होता. त्यानंतर रैनाची सुटकाही झाली. या घटनेनंतर सुरेश रैनाच्या व्यवस्थापकीय टीमनं एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं. त्यात त्यांनी म्हटलं की,सुरेश रैना मुंबईत एका शूटसाठी गेला होता आणि ती संपण्यास विलंब झाला. त्यानंतर एका मित्रानं रैनाला डिनरसाठी निमंत्रण दिले आणि तेथूनच तो दिल्लीचं विमान पकडण्यासाठी जाणार होता. त्याला मुंबईतील वेळेबाबतच्या नियमांची माहिती नव्हती. याबाबत पोलिसांनी माहिती देताच, रैनानं त्वरित आपली चूक मान्य केली. ही चूक जाणीवपूर्वक केली नाही. तो नेहमी नियमांचे पालन करतो असेही या पत्रकात म्हंटल होत.
१० जानेवारीपासून सुरूवात होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत रैना त्यात उत्तर प्रदेश संघाचे प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळेल.