Coronavirus : ‘कुत्रे’ आणि मांजरांनंतर आता ‘या’ प्राण्यांमध्ये देखील आढळला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कुत्रा, मांजर, वाघ आणि सिंह कोरोना विषाणूचे बळी ठरल्यानंतर आता या आजाराने मिंक या प्राण्याला देखील आपल्या जाळ्यात अडकवले आहे. एका अहवालानुसार नेदरलँडच्या एका फर फार्ममध्ये दोन मिंक नवीन कोरोना विषाणू म्हणजेच कोविड -19 ने संक्रमित झाल्याचे आढळले आहेत. मागील महिन्याच्या सुरूवातीस, न्यूयॉर्कमधून एक बातमी आली होती की प्राणीसंग्रहालयात सिंह आणि वाघांना त्यांची काळजी घेणाऱ्या कर्मचार्‍यांकडून कोरोना विषाणूची लागण झाली होती.

मेलबर्न विद्यापीठाचे डॉ. पेटा हिचेन्स म्हणाले की कोरोना विषाणू लुप्त पावत चालणाऱ्या वन्यजीवांसाठी ‘विध्वंसक’ असल्याचे सिद्ध होऊ शकतो आणि आता आपण त्यांचे संरक्षण करण्यासाठी काम करायला हवे. यात वन्यजीव व्यापार आणि तस्करीवर पूर्ण नियंत्रणाचा समावेश आहे. तसेच ते म्हणाले की मिंकला कोरोना विषाणूची लागण होणे हे आश्चर्यकारक नाही. कारण 2003 मध्ये जेव्हा सार्सचा प्रसार झाला होता, तेव्हा जवळपास 16 प्रजाती प्रभावित झाल्या होत्या. ज्यांमध्ये मिंक, हायना, वटवाघूळ, होर्सशू वटवाघुळांच्या अनेक प्रजाती, लाल कोल्हा, वन्य डुक्कर, रॅकून, पाळीव मांजर आणि कुत्री या प्राण्यांचा समावेश होता.

नेदरलँडमधील अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांकडून मिंकला लागण झाली. तेव्हापासून शेतकऱ्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले. सन 2013 मध्येच मिंक पाळण्यास बंदी घालण्यात आली होती, तर सध्याच्या मिंक फार्मला 2024 पर्यंत बंद करावे लागणार आहे.

आंतरराष्ट्रीय आणि यूके ह्यूमन सोसायटीचे कार्यकारी संचालक क्लेअर बास म्हणाले की प्राणी बर्‍याच वर्षांपासून बर्‍याच समस्यांचा सामना करीत आहेत आणि आता त्यांना बर्‍याच रोगांचा प्रसार होण्याची भीती देखील आहे. त्यामुळे आता सरकारने हा घृणास्पद व्यवसाय थांबविण्याची गरज आहे. तसेच ते म्हणाले की ‘कोविड -19 च्या उद्रेकातून आम्हाला एक गोष्ट शिकायला मिळाली आहे ती म्हणजे आपण जर प्राण्यांचा वापर थांबविला नाही तर त्याचे परिणाम मानव आणि प्राणी दोघांसाठी घातक ठरू शकतात.’