रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी आरोग्यमंत्री टोपे सकारात्मक, लवकरच मिळणार मान्यता

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – रत्नागिरी रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीच्या अफेरेसिस युनिटचे रविवारी ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी २० एकर जागा शोधून ठेवा, सगळी पूर्वतयारी करा, महाविद्यालयासाठी अध्यादेश काढायला तयार आहे. कारण ठाकरे कुटुंबाचा कोकणावर फार जीव असून, त्याला तत्काळ मान्यता मिळेल, अशी माहिती दिली आहे. त्यावेळी ते म्हणाले की, खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात, तर खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अध्यादेश काढून नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता मिळवली. त्याप्रमाणे रत्नागिरीतही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळू शकते.

यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेमुळे रत्नागिरीत कोरोनाची वाढ रोखण्यात यश आल्याचे देखील त्यांनी सांगितले. रत्नागिरीत मागील २४ तासात एकाही मृत्यूची नोंद नाही, हे या मोहिमेचेच यश असल्याचे खासदार विनायक राऊत म्हणाले. त्याचबरोबर रोज ३५ ते ४० रुग्ण पॉझिटिव्ह होणाऱ्या रत्नागिरी तालुक्यासह लगतच्या मतदार संघात आता आकडा शुन्यावर आला. यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम व जिल्हा प्रशासनाचे यश असल्याचे मंत्री उदय सामंत म्हणाले. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनाचे चांगले काम सुरू आहे. प्लाझ्मा उपचार सुविधेतून मृत्यूदरही एक टक्क्यांच्या खाली नेऊ, असा विश्वास देखील मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

दरम्यान, यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या उपचार केंद्राबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, आमदार शेखर निकम, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने या कार्यक्रमास उपस्थिती होते. त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी आभार मानले.