‘बोला काय विचारू ?’, मोदींच्या मुलाखतीवर राज ठाकरेंचा टोला

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन – नववर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रसारित झालेल्या मुलाखतीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली आहे. ही मुलाखत म्हणजे आपणच आपल्याला प्रश्न विचारल्यासारखं होते, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.

व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदीच स्वत:ची मुलाखत घेत असून  बोला काय विचारु? असं विचारत असल्याचं दाखवलं आहे. एक ‘मनमोकळी’ मुलाखत ! असल्याचं म्हणत राज ठाकरे यांनी आजूबाजूला मोदींचे परदेश दौरे, सरदार पटेल यांचा पुतळा, चीनमधील ड्रमवादन असे मोदीमय वातावरण चित्रित केले आहे.

नुकतंच नरेंद्र मोदी यांनी एएनआयला प्रदीर्घ मुलाखत दिली असून यावेळी अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांना नरेंद्र मोदी यांनी तब्बल ९५ मिनिटांची मुलाखत दिली. यावेळी त्यांनी नोटाबंदी, गांधी घराणं, उर्जित पटेल राजीनामा, जीएसटी, काळा पैसा, भाजपाचा विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव अशा विविध विषयांवर मतं मांडली. तसेच २०१९मध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावरच विश्वास दाखवतीलअसंही मोदी म्हणाले होते.