नेपाळमध्ये हेलिकॉप्टर अपघात, पर्यटन मंत्र्यांसह ६ जणांचा मृत्यू

काठमांडू : वृत्तसंस्था – नेपाळमधील तपेलजंग जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळले आहे. या दुर्घटनेत नेपाळचे पर्यटन आणि नागरी विमान वाहतूक मंत्री रविंद्र अधिकारी यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाला आहे. आज दुपारी १ च्या सुमारास नेपाळमधील पहाडी भागात बर्फवृष्टी दरम्यान ही घटना घडली.

पर्यटनमंत्री रविंद्र अधिकारी यांच्यासह येती एअरलाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक आंग तेरसिंग शेरपा, पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचे साहाय्यक अधिकारी युवराज दाहाल हे प्रवास करत होते. मंत्री, अधिकाऱ्यांचा समावेश असलेले हे पथक एका स्थानिक हवाई विमानतळाच्या पाहणीसाठी गेले होते.

हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर काहीवेळात ते बेपत्ता झाले होते. त्यानंतर ते पथिबारा भागात कोसळले, अशी माहिती तेथील स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी पोहचले, आणि त्यांनी घटनेची माहिती घेतली, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक सरबेंद्र खनाल यांनी दिली.