घराला घरपण देणार्‍या ‘डीएसकें’ना हवंय भाड्यानं घर, उच्च न्यायालयानं सांगितलं ‘लवादा’कडे दाद मागा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणात अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या ‘डीएसके’ समूहाची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. त्यातील जप्त केलेला बंगला व्हिला नंबर-1 हा डीएसके यांनी भाड्याने मागितला होता. मात्र, उच्च न्यायालयाने डीएसके यांची मागणी फेटाळून लावत ईडीने जप्त केलेले घर भाड्याने देण्यास नकार दिला आहे. ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी ईडीने जप्त केलेली मालमत्ता भाड्याने देण्याची तरतूद कायद्यात नसल्याचे सांगितले.

डीएसके यांनीच पुण्यातील आपला बंगला व्हिला नंबर -1 हा भाड्याने मिळावा, यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यासाठी दोन महिन्यांसाठी दरमहा 11 लाख रूपये भाडं देण्याची तयारी कुलकर्णी यांनी दाखवली होती. यावर उच्च न्यायालयात न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठेने ही मागणी फेटाळून लावली आहे. तसेच उच्च न्यायालयाने अपिलेट ट्रिब्युनल म्हणजेच ‘लवादा’कडे दाद मागण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणात अटकेत असलेले डी. एस. कुलकर्णी यांच्या ‘डीएसके’ समूहाची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. त्यामध्ये जमीन, इमारत, सदनिका, विमा योजना, गुंतवणूक आणि बँकांतील रोख ठेवींचा समावेश आहे डीएसके हे सध्या बँकांची कर्ज थकवल्याबद्दल आणि गुंतवणुकदारांचे पैसे बुडवल्या प्रकरणी तुरुंगात आहेत.

Visit : Policenama.com