राज्यातील विधानसभा निवडणुका पुढे ढकला : हायकोर्टात याचिका !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी महाराष्ट्रात सुरु झाली या असून अनेक राजकीय चर्चा आणि निर्णयांना उधाण आले आहे. गणेशोत्सवानंतर आता महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच ही विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करणारी जनहीत याचिका मुंबई हायकोर्टात करण्यात आली आहे. ही याचिका सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड.विवेक श्रावण चव्हाण उर्फ भाई विवेक चव्हाण, भारतीय दलित कोबरा प्रमुख यांनी केली आहे.

काय म्हटले आहे याचिकेत :
कोल्हापूर आणि सांगलीत आलेल्या महापूरामुळे महाराष्ट्रात सध्या ओला दुष्काळ आहे. तर मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे दुष्काळाच्या तीव्र झाला राज्यातील नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. यातच मतदान करणाऱ्यांपैकी ४० टक्के मतदार या दुष्काळग्रस्त भागातील आहेत. त्यामुळे सध्या विधानसभा निवडणूका घेण्यासाठी अनुकूल परिस्थिती राज्यात नसल्याने या निवडणूक पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी या जनहित याचिकेत करण्यात आली आहे.

दरम्यान, कोल्हापूर आणि सांगलीतील महापूरामुळे हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्याचे पुनर्वसन चालू असले तरीदेखील यास वेळ लागेल आणि निवडणूक लागू झाल्यास या कामाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे तसेच या भागातील लोकही मतदान करण्यास कितपत उपलब्ध असतील याबाबत शंका आहे. त्याअनुषंगाने हि मागणी होत असल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्रासह हरयाणा आणि झारखंडमध्ये हे वर्ष संपण्याआधी विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून बैठकाही घेतल्या जात आहेत. दिवाळीपूर्वी महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये मतदान आणि मतमोजणीची प्रक्रियाही पूर्ण होऊ शकते, असे काही माध्यमांनी म्हटले आहे.

न्यायालयाची भूमिका महत्त्वाची :
गणेशोत्सवामुळे थांबललेल्या विधानसभेच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा आता काही दिवसांतच होण्याची शक्यता आहे. यासाठीची सर्व पूर्वतयारीही झाल्याचे नुकतेच निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. मात्र आता या याचिकेवर न्यायालय काय भूमिका घेते त्यावर शासनाचा आणि निवडणूक आयोगाचा निर्णय अवलंबून असणार आहे.