हिंगोली : मॉर्निंग वॉक महागात पडला, पथकानं 68 जणांवर कारवाई करत वसूल केला दंड

ADV

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – आरोग्याच्या दृष्टीने सकाळी फिरणे चांगले असते. त्यामुळे अनेक लोक सकाळी फिरायला (मॉर्निंग वॉक) जातात. मात्र, सध्या कोरोनाचे संकट असल्यामुळे नागरिकांनी सकाळी फिरायला जाता येत नाही. तरी देखील काहीजण नियमांचे उल्लंघन करून सकाळी फिरायला बाहेर पडतात. सकाळी फिरणाऱ्या 68 जणांवर हिंगोली शहरामध्ये कारवाई करण्यात आली. ही कारवाई शनिवारी (दि.2) सकाळी साडेसहा ते नऊ या दरम्यान नगर पालिकेच्या वतीने करण्यात आली. हिंगोली नगरपालिका व हिंगोली जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशभरात सध्या लॉकडाऊन आहे.

लॉकडाऊन दरम्यान कोणीही घराबाहेर पडू नका, घरीच थांबा व कुटुंबाची काळजी घ्या असे आवाहन केले जात आहे. परंतु हिंगोलीकर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत असल्याने त्यांच्याविरूद्ध आता थेट कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या निर्देशाप्रमाणे हिंगोली शहरात ही कारवाई करण्यात आली. शहरातील विविध परिसरात पथकाने फिरुन मॉर्निंग वॉक करणाऱ्या 68 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 38 हजार 500 रुपये दंडही वसूल करण्यात आला.

ADV

सध्या शहरात लॉकडाऊनमुळे मॉर्निंगवॉक करणाऱ्यांवर निर्बंध घातले आहे. परंतु काही नागरिक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून सकाळी फेरफटका मारण्यास घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे नगरपालिका व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाद्वारे धडक कारवाई केली जात आहे. पथक प्रमुख म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, तसेच पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैंजने, पोलीस निरिक्षक ए.आय.सय्यद, सहायक पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरिक्षक एन.जी. केनेकर आदी काम पाहत आहेत. नागरिकांनी सकाळी मॉर्निंग वॉक करण्याकरीता घराबाहेर पडू नये, तसेच शहरातून वाहनांवर फिरु नये, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैंजने यांनी केले आहे.