लोकमान्य टिळक आणि सार्वजनिक गणेशोत्सव

पोलीसनामा ऑनलाईन (अमृता पवार) – इंग्रजांच्या काळात भारतीय संस्कृती लयास जात होती, तसेच लोक एकत्र येत नव्हते. लोकमान्य टिळकांना वाटत होते की, स्वातंत्र्यासाठी लोकांनी एकत्र यायला हवे. या प्रेरणेने टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरु केला आणि त्यातून लोकांनी एकत्र करण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांचे अंधानुकरण करणार्‍या भारतीयांबद्दल टिळकांना अत्यंत चीड होती. ते म्हणत, “आपले काही तथाकथित शिक्षित देशबांधव साहेबांची पिण्यात बरोबरी करू शकतात, पण साहेबांची भारताच्या राज्यकारभारातील जागा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा ते बाळगू शकतात का ?” त्यांच्या मते भारतीयांच्या दुर्बलतेची कारणे त्यांचा हरवलेला आत्मविश्वास आणि एकीची भावना ही होती आणि जोपर्यंत लोकांचा त्यांच्या धर्म, संस्कृती आणि इतिहासाबद्दलचा आदर परत वृद्धिंगत होत नाही तोपर्यंत राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या गप्पा मारणे व्यर्थ आहे. त्यांच्या ग्रीक संस्कृतीच्या अभ्यासातून त्यांना असे जाणवले की, ज्युपिटर देवाच्या स्मरणार्थ दर चार वर्षांनी साजरे होणारे ऑलिंपिक खेळ विविध ग्रीक राज्यांना एकत्र आणण्यात यशस्वी ठरले होते.

याच धर्तीवर इ.स. १८९३ मध्ये त्यांनी जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केले. हिंदूंमध्ये घराघरांत गणेशोत्सव अनेक शतकांपासून साजरा केला जात असे. पण टिळकांनी त्याला एका दहा दिवस चालणार्‍या सामाजिक महोत्सवाचे स्वरूप दिले. यामागे त्यांचे दोन उद्देश होते. एक म्हणजे या उत्सवाने ब्रिटिश-विरोधी मतप्रचारासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे आणि दुसरे म्हणजे याद्वारे हिंदू समाज जवळ येऊन त्यांच्यातील एकोपा वाढीस लागावा. १८९३च्या मुंबई आणि पुण्यातील हिंदू-मुस्लिम दंगलींमध्ये सरकारने मुस्लिमांची बाजू घेतली असे त्यांचे स्पष्ट मत होते व त्या पार्श्वभूमीवर हिंदूंना एकत्र करणे त्यांना गरजेचे वाटत होते. अनेक साम्राज्यांप्रमाणे इंग्रजाचा राजकीय बैठकींना विरोध होता पण धर्माच्या बाबतीत ते दोन हात दूर राहणेच पसंत करत. याचा फायदा टिळकांनी गणेशोत्सवाच्या पुनरुज्जीवनासाठी करून घेतला.

थोड्याच अवधीत गणेशोत्सव सर्वदूर पोहोचला आणि अनेक लहान-मोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापित झाली. गणेश चतुर्थीला सुरू झालेला गणेशोत्सव हा दहा दिवसांचा सोहळा असतो. सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश स्वातंत्रपूर्व काळात जन जागृती, लोक संघटन, लोक संग्रह या कारणासाठी होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याचे स्वरूप बदलले आहे. लोकमान्य टिळक यांनी घरगुती गणेशोत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले, ते पुणे शहरातून. स्वातंत्र्य चळवळीला बळ देण्यासाठी टिळक यांनी हे पाऊल उचलले. टिळक यांनी दैनिक केसरीमध्ये पहिल्या गणेशोत्सवानंतर लिहिलेल्या अग्रलेखात त्या काळच्या वातावरणाचा उल्लेख केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –